80 टक्के प्रवासी संख्या : अडीच तासांचा प्रवास
बेळगाव : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या दिल्ली-बेळगाव-दिल्ली विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. केवळ 2 तास 30 मिनिटांमध्ये बेळगावहून दिल्लीला पोहोचता येत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, सांगली येथूनही प्रवासी दिल्लीसाठीचा प्रवास करीत आहेत. यामुळे पहिल्याच महिन्यात विमानफेरीला 80 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे प्रवासीसंख्येवरून दिसून आले. 5 ऑक्टोबरपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरीला प्रारंभ झाला. देशातील सर्वात मोठ्या इंडिगो एअरलाईन्सने विमानफेरी सुरू केली. 186 प्रवासी क्षमता असणारे बोईंग विमान या मार्गावर सेवा देत आहे. पहाटे 6.20 वाजता दिल्ली येथून निघालेले विमान सकाळी 8.50 वाजता बेळगावला पोहोचते. परतीच्या प्रवासात सकाळी 9.20 वाजता बेळगावमधून निघालेले विमान 11.50 वाजता दिल्लीला पोहोचते. बेळगाव हे उद्योग, शिक्षण, पर्यटन, कृषी या क्षेत्रात अग्रेसर आहे. याबरोबरच मराठा लाईट इन्फंट्री, एअरमन ट्रेनिंग स्कूल, कोब्रा ट्रेनिंग स्कूल, केएलई शिक्षण संस्था यासारख्या मोठ्या संस्था असल्याने बेळगावहून दिल्लीला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याबरोबरच कोल्हापूर, सांगली व हुबळीमधूनही अनेक उद्योजक, व्यापारी बेळगावमधून दिल्लीचा प्रवास करीत आहेत. यामुळे महिनाभरातच विमानफेरीला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न
बेळगाव-दिल्ली विमानफेरीला 80 टक्के प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. बेळगावहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करत आहे.
-त्यागराजन, संचालक, बेळगाव विमानतळ