मोठ्या जंगलांच्या तुलनेत यांची वाढ 10 पट वेगवान, हवामान बदलाच्या विरोधातील सिक्रेट वेपन
आशिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये टाइनी, मिनी किंवा पॉकेट फॉरेस्ट (छोटी शहरी जंगलं) ची व्याप्ती वाढत आहे. जागतिक तापमानवाढीच्या काळात कमी होत चाललेल्या वनक्षेत्रादरम्यान ही दिलासाजनक घडामोड ठरू शकते. लोक पार्किंग क्षेत्र, शाळेतील मैदाने आणि रिकामी क्षेत्रांना छोट्या जंगलांमध्ये रुपांतरित करत आहेत.
मोठ्या जंगलाच्या तुलनेत छोट्या जंगलांचा विकास 10 पट वेगवान होत असतो. ही जंगले 30 पट अधिक घनदाट असतात आणि काही प्रमाणात जैववैविध्य राखून असतात. या जंगलांकडून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतला जातो तसेच यामुळे वन्यजीवांनाही मदत होते. टाइनी फॉरेस्टला केवळ 3 वर्षांपर्यंत पाणी देण्याची गरज असते. याचबरोबर शहरी भागांमध्ये टाइनी फॉरेस्ट तापमान कमी करण्यास सहाय्यभूत ठरत आहेत. म्हणजेच छोटी जंगलं वातावरण थंड ठेवत आहेत.
छोटी जंगलं जपानी इकोलॉजिस्ट अकीरा मियावाकी यांच्या ओसाड जमिनीवर छोटी, घनदाट शहरी जंगल निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानाने प्रेरित आहे. ज्या प्रजातींच्या वृक्षांची यात लागवड केली जाते, त्यात हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. याकरता मातीची स्थितीही महत्त्वपूर्ण असते असे इकोलॉजिस्ट्सचे सांगणे आहे.
मानवी हालचालींमुळे पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होत असून यामुळे तापमान वाढत आहे. यालाच जागतिक तापमानवाढ म्हटले जाते. जागतिक तापमानवाढीमुळे जंगलांमध्ये वणवे निर्माण होत असून वृक्षांचे प्रमाण कमी होत आहे. दुसरीकडे वृक्षतोडीचा प्रकार वेगाने सुरू आहे. यामुळे जैववैविध्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत अधिकाधिक वृक्षलागवड करण्याची गरज आहे. पॉकेट फॉरेस्टचा ट्रेंड ही गरज पूर्ण करत आहे. यामुळे कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे याला हवामान बदलाच्या विरोधातील सिक्रेट वेपन म्हणून पाहिले जात आहे.
लॉस एंजिलिसमध्ये ग्रिफिथ पार्कची (टाइनी फॉरेस्ट) देखरेख करणाऱ्या कॅथरीन यांच्यानुसार टाइनी फॉरेस्टची संकल्पना वृक्षारोपणापेक्षा अत्यंत वेगळी आहे. यात केवळ रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले जात नाही तसेच टेरेस फार्मिंगचाही यात समावेश नसतो. येथे वनाच्छादन वाढविण्याचा मुद्दा असून यात छोट्या छोट्या प्रमाणात हे केले जात आहे. ग्रिफिथ पार्क एक हजार चौरस फुट क्षेत्रात निर्माण करण्यात आले आहे. या वनामुळे अनेक पक्ष्यांना आता अधिवास मिळाला आहे.