सामनावीर गिलचे दमदार शतक, शमी आणि मोहित शर्माचो प्रत्येकी 4 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सामनावीर शुबमन गिलचे दमदार शतक तसेच मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या आणि यजमान गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव करत सर्वप्रथम प्लेऑफ गटात प्रवेश केला. गुजरात टायटन्सने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 13 सामन्यातून 18 गुणासह आघडीचे स्थान भक्कम करत प्लेऑफमध्ये स्थान मिळविले.
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 154 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. सनरायजर्स हैदराबादचे प्लेऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यांनी 12 सामन्यातून केवळ 8 गुण घेतले आहेत.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 154 धावा जमविल्या. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचा डाव कोलमडला. हैदराबाद संघातर्फे हेन्रिच क्लासेनने एकाकी लढत देत 44 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 64 तर भुवनेश्वर कुमारने 26 चेंडूत 3 चौकारांसह 27, कर्णधार मार्करमने 10 चेंडूत 1 चौकारासह 10, मार्कंडेने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. पॉवरप्ले दरम्यान हैदराबाद संघाने 6 षटकात 45 धावा जमविताना 4 गडी गमाविले. हैदराबादचे पहिले अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 80 चेंडूत आणि 150 धावा 118 चेंडूत फलकावर लागले. क्लासेन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आठव्या गड्यासाठी 68 धावांची भागिदारी केली. हैदराबादच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. हैदराबादला अवांतराच्या रुपात 9 धावा मिळाल्या. मोहम्मद शमीने 21 धावात 4 तर मोहित शर्माने 28 धावात 4 आणि यश दयालने 31 धावात 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. डावातील पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर सलामीचा साहा खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 147 धावांची शतकी भागिदारी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेले. गुजरातचे पहिले अर्धशतक 25 चेंडूत फलकावर लागले. तर पॉवरप्लेच्या 6 षटकात गुजरातने 65 धावा जमविताना 1 गडी गमाविला. गिल आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी भागिदारी 22 चेंडूत नोंदविली तर गिलने आपले अर्धशतक 9 चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत पूर्ण केले.
गुजरातचे शतक 61 चेंडूत फलकावर लागले तर गिल आणि साई सुदर्शन यांची शतकी भागिदारी 58 चेंडूत नोंदविली गेली. त्यामध्ये गिलचा वाटा 84 धावांचा होता. डावातील 15 व्या षटकात गुजरातची ही जोडी फोडण्यात हैदराबादला यश मिळाले. जान्सेनने साई सुदर्शनला नटराजनकरवी झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या. गुजरात टायटन्सच्या 150 धावा 91 चेंडूत नोंदविल्या गेल्या. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातचे इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यापूर्वीच बाद झाले. कर्णधार हार्दिक पंड्याने 8, मिलरने 7, तेवातियाने 3, शनाकाने 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. गुजरातचे 4 फलंदाज खाते उघडण्यापूर्वीच बाद झाले. शतकवीर गिल डावातील शेवटच्या षटकात बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर समदने गिलचा झेल टिपला. त्याने 58 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 101 धावा झळकाविल्या. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गिलचे हे पहिले शतक आहे.
2023 च्या आयपीएल मोसमात आतापर्यंत 5 फलंदाजांनी शतके झळकाविली आहेत. सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, प्रभसिमरन सिंग, हॅरी ब्रुक हे अन्य शतकवीर आहेत. गुजरातच्या डावात 2 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. गुजरातला अवांतराच्या रुपात 13 धावा मिळाल्या. त्यामध्ये 10 वाईड आणि 2 नो बॉलचा समावेश आहे. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 30 धावात 5 गडी बाद केले. या आयपीएल स्पर्धेतील भुवनेश्वर कुमारची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. फारुकी, जान्सेन आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – गुजरात टायटन्स 20 षटकात 9 बाद 188 (गिल 58 चेंडूत 101, साई सुदर्शन 36 चेंडूत 47, हार्दिक पंड्या 8, मिलर 7, शनाका 9, तेवातिया 3, अवांतर 13, भुवनेश्वर कुमार 5-30, फारुकी, जान्सेन, टी. नटराजन प्रत्येकी 1 बळी).
सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 9 बाद 154 (क्लासेन 44 चेंडूत 64, मारक्रेम 10 चेंडूत 10, भुवनेश्वर कुमार 26 चेंडूत 27, मार्कंडे 9 चेंडूत नाबाद 18, अवांतर 9, मोहम्मद शमी 4-21, मोहित शर्मा 4-28, यश दयाल 1-31).