बांधकाम खात्याच्या आर्किटेक्ट विभागाला दिली भेट
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेंगळूर के. आर. चौकातील बांधकाम खात्याच्या आर्किटेक्ट विभाग व मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन नूतन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडांगणाच्या विकासासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेक विकासाभिमुख योजना राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमिवर मंत्री जारकीहोळी यांनी बांधकाम खात्याच्या आर्किटेक्चर विभागाला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय हटवून त्या ठिकाणी नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील आराखड्याची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. याबरोबरच जिल्हा क्रीडांगणाचाही विकास करण्यात येणार आहे. त्या दृष्टिने त्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या विकासकामांची माहिती जाणून घेतली. विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित इमारतीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी मुख्य आर्किटेक्चर अधिकारी व्ही. एन. पाटील, साहाय्यक आर्किटेक्ट, मुख्य कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.