बेळगाव : शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे, ज्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात लागू केले. सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय करीत उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून दूरस्थ शिक्षण विभागाच्यावतीने बीए, बीकॉम, एमए, एमकॉम यासह इतर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांनी केले. सोमवारी शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्यावतीने 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागाचे समन्वयक डॉ. कृष्णा पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
डॉ. कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची माहिती करून देत कोणते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, याची सविस्तर चर्चा केली. काही अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. एकाच वेळी बेळगावमधील नियमित पदवी घेत असताना शिवाजी विद्यापीठाची दूरस्थ पदवी घेण्याचीही संधी उपलब्ध आहे. एकूण 12 अभ्यासक्रमांना दूरस्थ पद्धतीने प्रवेश घेता येतो. या व्यतिरिक्तही अनेक अभ्यासक्रम असून सेट, नेट, एमपीएससी, युपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून माफक दरात फी आकारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मालोजी अष्टेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे आभार मानले. सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची ही एक संधी असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका व्यक्त केल्या. त्याला विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच याच कार्यक्रमात इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रवेशदेखील नोंदवून घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले. यावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.