बागायत खात्याचा उपक्रम : विविध फळांचे ज्ञान मिळणार
बेळगाव : विद्यार्थ्यांना बागायत शेतीची आवड निर्माण व्हावी, यासाठी फलोत्पादन खात्यामार्फत शुक्रवारी विद्यार्थ्यांना एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर उपस्थित होते. यावेळी राजू सेठ यांनी मुलांना लहान वयात विविध झाडांचे संवर्धन करण्याची सवय लावली पाहिजे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याच्या प्रदूषित जगात झाडांची संख्या वाढणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांना बागायती पिकाचे महत्त्व, पद्धती, गांडूळ खत, कंपोस्ट पद्धती, मधमाशा पालन, टेरेस गार्डन, विविध भाजीपाल्यांच्या बिया, कडीपत्ता, कृत्रिम आळंबी उत्पादन याबाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विविध शाळांचे 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
1500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार
बागायत खात्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी बागकामांतर्गत 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी 100 हून अधिक विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अलिकडे जिल्ह्यात बागायत क्षेत्र वाढले आहे. काजू, द्राक्ष, केळी, आंबा, अन्नस, पेरू, आदींच्या बागा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे बागायतीचे व्यवस्थापन आणि संवर्धन कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यासह कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.