कंग्राळी मैदानात कंग्राळीच्या 52 मल्लांचा विजय : महिलांचाही समावेश
सदानंद चव्हाण , उमेश मजुकर/ कंग्राळी बुद्रुक, बेळगाव
कंग्राळी येथील बाल हनुमान तालीम मंडळ व कंग्राळी कुस्तीगिर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मसनाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राचा महान भारत केसरी सिकंदर शेखने महान भारत केसरी अभिषेक गुज्जरवर अवघ्या 12 व्या मिनिटाला एकलांगी लावून हाताचा कस लावत आस्मान दाखवित उपस्थित 20 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
सायंकाळी 8.15 मिनिटांनी प्रमुख कुस्ती ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, ऑलिम्पिकपटू एमआर पाटील, काशिनाथ पाटील, डबल कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, वाय. आर. पाटील, सागर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचा महान भारत केसरी सिकंदर शेख व महान भारत केसरी अभिषेक गुज्जर ही कुस्ती लावण्यात आली. पहिल्या मिनिटापासूनच दोघांनी एकमेकावर आक्रमक चढाया सुरु केल्या. दुसऱ्या मिनिटाला अभिषेक गुज्जरने दुहेरी पट काढून सिकंदरवर ताबा मिळविला. पण खाली राहिलेल्या सिकंदर शेखने खालून डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेत चाट मारुन अभिषेक गुज्जरवर ताबा मिळविला. चौथ्या मिनिटाला सिकंदरने एकेरी पट काढून अभिषेकवर ताबा मिळवित मानेचा कस काढून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून अभिषेकने सुटका करुन घेत सिकंदरवर ताबा मिळविला. सातव्या मिनिटाला गुज्जरने एकेरी पट काढून पायाला आकडी लावीत चीत करण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच हुशारीने सिकंदरने स्वत:ला सावरत खालून पुन्हा डंकी मारुन गुज्जरवर कब्जा मिळविला. यावेळी खालून फिरून गुज्जरने त्यातून सुटका करुन घेतली. दहाव्या मिनिटाला गुज्जरने दुहेरी पट काढीत घीस्सा मारीत सिकंदरवर ताबा मिळविला. त्यातून पुन्हा खालून डंकी मारुन सिकंदर शेखने गुज्जरवर ताबा मिळविला व मानेवर कस काढत पायाला एकलांगी भरली. पायाची एकलांगी भक्कम झाल्यानंतर एकेरी हाताचा कस चढवित 12 व्या मिनिटाला एकलांगी कस लावत बलाढ्या अभिषेक गुज्जरला आस्मान दाखवित उपस्थित 20 हजार शौकिनांची मने जिंकत बेळगावातील विजयी परंपरा कायम राखली आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व राष्ट्रीय चॅम्पियन कमलजीतसिंग पजाब ही कुस्ती राष्ट्रीय पदक विजेते महेश डुकरे, बळाराम पाटील, चेतन बुद्धन्नावर व काशिराम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला संगमेश बिराजदारने एकेरी पट काढीत कमलजीत पंजाबवर ताबा मिळविला व बॅकथ्रो मारुन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सावधपणे कमलजीतने सुटका करुन घेतली. सहाव्या मिनिटाला कमलजीतने दुहेरी पट काढीत संगमेशला खाली घेत लपेट मारण्याचा प्रयत्न केला. पण संगमेशने त्यातून सुटका करुन घेऊन कमलजीतवर ताबा मिळवित पुन्हा बॅकथ्रो मारुन चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातूनही कमलजीतने सावधपणे सुटका करुन घेतली. ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तिसऱ्या क्रमांकाच्या अ कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन रोहित पाटील कंग्राळी व दिलीप बंडगर सांगली ही कुस्ती ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, नाथाजी पाटील यांच्याकडून गदेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या कुस्तीमध्ये रोहित पाटीलने चौथ्या मिनिटाला एकेरी पट काढीत मानेवर घुटणा ठेऊन घुटणा डावावरती नेत्रदिपक विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाच्या ब कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरच्या सतपाल नाग टिळकने किर्तीकुमार कार्वेचा लपेट डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्ती कलीम मुल्लानी गंगावेश व विक्रम शिनोळी ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती गुणांवरती निर्णय घेण्याचे ठरविले. त्यामध्ये कलीम मुल्लानीने एकेरी पट काढून गुण मिळवित विजय संपादन केला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने गवस कुंदरगी दर्गाचा एकलांगी डावावर विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने महांतेश कोल्हापूरवर ढाक डावावरती पराभव केला. सातव्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी व शिवानंद अंबी ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत ज्योतिराम कंग्राळीने सुरेश तालीम पवार सांगलीचा घीस्सा डावावर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने रुपेश पाटील कोल्हापूरचा घुटणा डावावर विजय मिळविला.