ऑनलाईन टीम / मुंबई :
मी राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो. त्यामुळे मला अयोध्येतून साधू, महंतांकडून बोलावणं आलं आहे. मी लवकरच अयोध्येला जाणार आहे, असं ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी जाहीर केलं आहे. (Gunaratna sadavarte decided to visit ayodhya)
गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सीआरपीसी कलम 110 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आज मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही नोटीस राजकीय हेतून पाठवण्यात आली आहे. या नोटिशीनुसार समाजात एखाद्या व्यक्तीला मोकळं सोडणं धोक्याचं आहे. या कलमांतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पण कोर्टात अद्याप काहीही सिद्ध झालेलं नसताना अशा प्रकारची नोटीस पाठवणं म्हणजे हा कोर्टाचा अवमान आहे. मी बँकेची निवडणूक लढवणार असल्याने सरकारच्या पायाखालची वाळू घसरली आहे. डंके की चोट पर आम्ही यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार पायदळी तुडवू शकत नाही. मी राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो. त्यामुळे मला अयोध्येतून साधू, महंतांकडून बोलावणं आलं आहे. एसटी कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठीचे प्रचारक हे या महिन्याच्या शेवटी अयोध्येला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी जातील. आमच्या जाण्याला भारतातला कोणताही कायदा आडवू शकत नाही.
दरम्यान, सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार आहेत. तसेच यापुढे राज्यातील प्रत्येक निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.