आयएसआयचे वाढले टेन्शन : एलईटीप्रमुख रडून बेहाल
वृत्तसंस्था/ पेशावर
भारताला 26/11 चा हल्ला घडवून वेदना देणारा दहशतवादी हाफिज सईद सध्या स्वत:च्या पुत्राविषयी चांगले वृत्त ऐकण्यासाठी बेचैन आहे. त्याचा पुत्र कमालुद्दीन सईद हा 26 सप्टेंबरपासून गायब आहे. पेशावरमध्ये कमालुद्दीनला अखेरचे पाहिले गेले होते. कमालुद्दीनला काही गुंडांनी एका कारमधून पळवून नेल्याचे समजते. कमालुद्दीनचा शोध पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला देखील अद्याप लावता आलेला नाही.
कमालुद्दीन गायब झाल्याने आयएसआयमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुत्र गायब झाल्याने हाफिज सईद कोलमडून गेल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी जून 2021 मध्ये हाफिजच्या लाहोर येथील घराबाहेर एक स्फोट झाला होता, या स्फोटात तीन जण मारले गेले होते. हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. हाफिज हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. लष्कर-ए-तोयबावर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेसह भारत, अमेरिका, युरोपीय महासंघ, रशिया आणि ऑस्ट्रेलियानेही बंदी घातली आहे. तर हाफिज हा मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. सईद विरोधात अमेरिकेने 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांवर एका मागोमाग येणाऱ्या संकटांमुळे आयएसआयची झोप उडाली आहे. अलिकडेच कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर येथील एका पार्कमध्ये मौलवी जियाउर्रहमानची हत्या करण्यात होती. रहमान हा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेटिव्ह होता. त्याची हत्या खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंह पंजवारच्या धर्तीवर झाली आहे. काही दिवसांपूर्वी पीओकेमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कासिमची हत्या करण्यात आली होती.