भारताचा डाव 296 धावांत संपुष्टात, ऑस्ट्रेलियाला एकूण 296 धावांची आघाडी, कमिन्सचे 3 बळी
वृत्तसंस्था/ लंडन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या तिसऱ्या दिवशीअखेर ऑस्ट्रेलियाने 44 षटकांत 4 बाद 123 धावा जमवित भारतावर एकूण 296 धावांची आघाडी घेतली आहे. खेळ थांबला तेव्हा लाबुशेन 41 व ग्रीन 7 धावांवर खेळत होते.
दुसऱ्या डावात वॉर्नर व ख्वाजा यांचे बळी लवकर गमविल्याने ऑस्ट्रेलियाची 24 अशी स्थिती झाली. लाबुशेन व स्मिथ यांनी ही पडझड रोखत तिसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी केली. जडेजाला उत्तुंग फटका मारताना स्मिथ 34 धावांवर बाद झाला. त्याने 47 चेंडूत 3 चौकार मारले. आणखी 25 धावांची भर पडल्यानंतर हेडही 18 धावा काढून बाद झाला. त्याने 27 चेंडूत 2 षटकार मारले. लाबुशेन व ग्रीन यांनी उर्वरित षटके सावधपणे खेळून काढली. जडेजाने 2 व यादव, सिराज यांनी एकेक बळी टिपले.
अजिंक्य रहाणेचे अर्धशतक
ऑस्ट्रेलियाने उपाहारानंतरच्या सत्रात भारताचा पहिला डाव 296 धावांत गुंडाळून 173 धावांची आघाडी मिळविली. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करीत 89 धावा जमविल्या तर शार्दुल ठाकुरनेही अर्धशतकी खेळी करीत त्याला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा जमविल्यानंतर दुसऱ्या दिवशीअखेर भारताने पहिल्या डावात 5 बाद 151 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. रहाणेने अप्रतिम कौशल्य व धाडस दाखवत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करीत शार्दुल ठाकुरच्या साथीने भारताचा फॉलोऑन
टाळला. उपाहारापर्यंत भारताने एक बळी गमवित 22 षटकांत जलद 109 धावांची भर घातली. प्रारंभी केएस भरत (5) पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बोलँडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. जिगरबाज खेळी करणाऱ्या रहाणेला नंतर शार्दुलकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी उपाहारापर्यंत अभेद्य 108 धावांची भागीदारी केली होती. उपाहारास खेळ थांबला तेव्हा रहाणे 89 व शार्दुल 36 धावांवर खेळत होते. शार्दुलच्या मनगटाला दोनदा उसळते चेंडू लागले आणि दोनदा त्याला जीवदानही मिळाले.
फॉलोऑनचे सावट असतानाही भारताने या सत्रात जलद धावा जमविल्या, हे विषेष बोलँड व कमिन्स यांनी पहिल्या तासात लेंग्थ बॉलवर उसळी मिळवित होते. त्यांच्या प्रत्येक चेंडूवर बळी मिळेल, इतका भेदक मारा ते करीत होते. बोलँडने भरतचा बचाव भेदत आत वळलेल्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडविला. दुसऱ्या बाजूने कमिन्सही तितकाच धोकादायक वाटत होता. त्याचे लागोपाठचे दोन चेंडू ठाकुरच्या हाताला लागल्यावर फिजिओला मैदानात यावे लागले.
ठाकुरप्रमाणे रहाणेलाही दैवाची साथ मिळाली. 72 धावांवर असताना स्लिपमध्ये वॉर्नरने त्याचा झेल सोडला. काही चौकार मिळविल्यानंतर रहाणेने कमिन्सला फाईनलेगला पुलचा शानदार षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. ग्रीनला मारलेला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह हा त्याचा सकाळच्या सत्रातील सर्वोत्तम फटका होता. पहिल्या सत्रातील शेवटच्या काही षटकांत बरीच अॅक्शन पहावयास मिळाली. रहाणेने लियॉनला बॅकफूट पंच व कव्हर ड्राईव्हचे लागोपाठ दोन चौकार मारले. सत्रातील शेवटच्या षटकात ठाकुरला पायचीत देण्यात आले. पण तो नोबॉल असल्याचे नंतर स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशीही कमिन्सने रहाणेला पायचीत केले, त्यावेळी त्याने ओव्हरस्टेप केले होते.
उपाहारानंतर मात्र रहाणे लगेचच बाद झाला. त्याने कमिन्सला शानदार स्क्वेअर ड्राईव्ह केले होते. पण चौथ्या स्लिपमधील ग्रीनने उजवीकडे उंच झेपावत त्याचा अफलातून झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. रहाणेने 129 चेंडूत 11 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 89 धावा जमविताना ठाकुरसमवेत 109 धावांची भागीदारी केली. यावेळी भारताने 7 बाद 261 धावा जमविल्या होत्या. ठाकुरने नंतर 108 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. शमीसमवेत 23 धावांची भर घातल्यानंतर तो बाद झाला. ग्रीनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाने त्याचा झेल टिपला. 109 चेंडूच्या खेळीत त्याने 6 चौकार मारले. स्टार्कने शमीला 13 धावांवर कॅरेकरवी झेलबाद करीत भारताचा पहिला डाव 296 धावांत संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने 3, स्टार्क, बोलँड, ग्रीन यांनी प्रत्येकी 2 तर लियॉनने एक बळी मिळविला.
रहाणेच्या 5000 कसोटी धावा पूर्ण
भारताचा मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने कसोटी पुनरागमनात शानदार अर्धशतक नोंदवताना कसोटीतील 5000 धावांचा टप्पाही गाठला. 35 वर्षीय रहाणेने 83 व्या कसोटीत 69 धावा जमविल्यानंतर त्याने हा माईलस्टोन गाठला. हा टप्पा गाठणारा तो भारताचा 13 वा फलंदाज असून कपिल देव, गुंडाप्पा विश्वनाथ, अझहरुद्दिन, वेंगसरकर, पुजारा, गांगुली, कोहली, सेहवाग, लक्ष्मण, गावसकर, द्रविड, तेंडुलकर यांनी याआधी असा पराक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 26 वे अर्धशतक 92 चेंडूत पूर्ण केले. जानेवारी 2022 नंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प.डाव : 121.3 षटकांत सर्व बाद 469 : वॉर्नर 43 (60 चेंडूत 8 चौकार), उस्मान ख्वाजा 0, लाबुशेन 26 (62 चेंडूत 3 चौकार), स्मिथ 121 (268 चेंडूत 19 चौकार), हेड 163 (174 चेंडूत 25 चौकार, 1 षटकार), ग्रीन 6, कॅरे 48 (69 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), स्टार्क 5, कमिन्स 9, लियॉन 9, बोलँड नाबाद 1, अवांतर 38. गोलंदाजी : शमी 2-122, सिराज 4-108, ठाकुर 2-83, उमेश यादव 0-7, जडेजा 1-56.
भारत प.डाव 69.4 षटकांत सर्व बाद 296 : रोहित शर्मा 15, गिल 13, पुजारा 14, कोहली 14, अजिंक्य रहाणे 89 (129 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), जडेजा 48 (51 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), केएस भरत 5, शार्दुल ठाकुर 51 (109 चेंडूत 6 चौकार), उमेश यादव 5, शमी 13 (11 चेंडूत 2 चौकार), सिराज नाबाद 0, अवांतर 29.
गोलंदाजी : कमिन्स 3-83, स्टार्क 2-71, बोलँड 2-59, ग्रीन 2-44, लियॉन 1-19.
ऑस्ट्रेलिया दु.डाव 44 षटकांत 4 बाद 123 : उस्मान ख्वाजा 13, वॉर्नर 1, लाबुशेन खेळत आहे 41, स्मिथ 34, हेड 18, ग्रीन खेळत आहे 7, अवांतर 9. गोलंदाजी : जडेजा 2-25, उमेश यादव 1-21, सिराज 1-41,