हलशीत 71 वर्षांची एकजूट कायम
खानापूर : बाराव्या शतकापासून कदंब राजाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या हलशी येथे गेल्या 71 वर्षांपासून एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कायम आहे. यापासून प्रेरणा घेत इतर गावांनी देखील आपल्या गावात एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खानापूर तालुक्यात अनेक दुर्गम गावे असली तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी असून 162 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र नंदगड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झालेल्या काही वर्षानंतर हलशी गावातील समाजसुधारकांनी पुढाकार घेऊन गावात सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुरुवातीला हलशी येथील मठामध्ये असलेल्या मराठी शाळेच्या आवारात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. सुरुवातीला लहान मूर्ती आणि अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच पंचवीस वर्षाहून अधिक वर्षे मठांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात होता. मात्र त्यानंतर गणेशोत्सव दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेत ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या मंदिर परिसरात उत्सव साजरा केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जात असून विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाकडून केले जाते. इंदिरानगर आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. मात्र गावांमध्ये असलेली एक गाव एक गणपती ही परंपरा कायम ठेवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे हलशी गावाने ज्याप्रमाणे एक गाव एक गणपतीची परंपरा कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे इतर गावानी देखील एकच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या हलशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षपदी अध्यक्ष विशाल गुरव आहेत तर उपाध्यक्षपदी नरसिंग घाडी, खजिनदार लक्ष्मण पवार, सेक्रेटरीपदी लक्ष्मण हलगेकर आहेत. तर राजन मडवळकर, शिवाजी कदम, सुभाष गुरव, गंगाराम मडवळकर, नामदेव जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उत्सव चांगल्याप्रकारे पार पडावा यासाठी प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सव काळात अनेक भाविक हलशी भागातील मंदिरे पाहण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना गावातील गणपती पाहण्याची संधी देखील मिळते.
विसर्जन मिरवणूकही उत्साहात
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव चांगल्याप्रकारे साजरा व्हावा यासाठी गावातील सर्वांचे सहकार्य मिळत आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जात असून गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवली जात आहे. विसर्जन मिरवणूक देखील भव्य प्रमाणात काढण्यात येते.
– विशाल गुरव, अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हलशी
ओलमणीत दरवषी एका गल्लीला गणेशोत्सवाची संधी
जांबोटी : ओलमणी (ता. खानापूर) येथे ‘एक गाव एक गणपती’ परंपरा अद्याप कायम असून गेल्या 62 वर्षापासून ही संकल्पना जोपासून तालुक्मयात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या ओलमणी हा गाव संपूर्ण पश्चिम भागात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकारक्षेत्रात अग्रेसर आहे. गावात विविध राजकीय पक्षांचे व विभिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. मात्र गावातील सण उत्सव परंपरेनुसार एकत्रित गुण्यागोविंदाने साजरे करतात. येथे गेल्या 62 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तत्कालीन पंचमंडळींनी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माऊती मंदिरमध्ये गणेशोत्सवाला प्रारंभ केला. तीच परंपरा आजही कायम आहे. गावची लोकसंख्या कमी असल्यामुळे सर्वजण मिळून गणेशोत्सव साजरा करीत होते. मात्र कालांतराने गावचा विस्तार व लोकसंख्येत देखील वाढ झाल्यामुळे गणेशोत्सवात सर्वांना सहभागी होता यावे या उद्देशाने पंचमंडळीने एकत्र जमून दरवषी एका गल्लीला गणेशोत्सव साजरा करण्याची संधी दिली आणि ती परंपरा आजही कायम आहे. यावर्षी सरस्वती गल्ली यांच्यामार्फत गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. गणेशोत्सव निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अनंतचतुर्दशी दिवशी मिरवणुकीने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गुंजीत 73 वर्षांची परंपरा अखंडित
गुंजी : गेल्या 73 वर्षापासून गुंजी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वास्तविक गुंजी हे जवळजवळ तीन हजार लोकवस्तीचे गाव असून अनेक जातीधर्माचे लोक आहेत. मात्र सर्वच लोक एकमेकांचा सण उत्साहात साजरे करतात. त्यामुळे प्रत्येक उत्सवाला एक वेगळेपण येते. गणेशोत्सव देखील त्याला अपवाद नसून या सणांमध्येही येथील इतर धर्माचे लोक देणगी देऊन या उत्साहात प्रत्यक्ष सहभागी होतात. त्यामुळेच गेली 73 वर्षे या गावात ‘एक गाव एक गणपतीची परंपरा’ अखंडितपणे सुरू आहे. यावषी प्रदीर्घकालानंतर श्रीगणेश मंडळाची पुनर्रचना करून अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यावषीचे खास वैशिष्ट्या म्हणजे मंडळाने आकर्षित मंडप सजावट केली असून डॉल्बी, ढोलताशाला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणुकीसह श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून ते सुरळीत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वासुदेव गोरल आणि उपाध्यक्ष महेश कापोलकरसह मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. गुंजी गाव हे इतर खेड्यांचा केंद्रबिंदू असल्याने गणपती व देखावा पाहण्यासाठी खेड्यातील भक्तगणांची दररोज वर्दळ असते. त्याचबरोबर दररोज सायंकाळच्या महाआरतीला प्रसाद देण्यासाठी अनेक भक्तांची चढाओढ दिसून येत आहे.