इम्रान यांचे सहकारी फैजल यांचा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि माजी आयएसआय प्रमुख जनरल फैज हमीद यांनी अल कादिर ट्रस्ट घोटाळा प्रकरणात 5 अब्ज रुपयांची लाच स्वीकारली होती असा खुलासा माजी मंत्री फैजल वाबडा यांनी केला आहे. वाबडा हे इम्रान सरकारमध्ये मंत्री राहिले होते. अल कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणीच इम्रान यांना 9 मे रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर पाकिस्तानात झालेल्या हिंसेत 8 जण मारले गेले होते.
अल कादिर ट्रस्ट घोटाळ्याप्रकरणी इम्रान यांच्यासह त्यांची पत्नी बुशरा अन् फराह गोगी आरोपी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजेन्सीने एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केल्यावर तपासादरम्यान त्याच्याकडे सुमारे 60 अब्ज रुपये (पाकिस्तानी चलनात) असल्याचे आढळून आले होते. अटकेतील आरोपी पाकिस्तानातील सर्वात मोठा लँड माफिया मलिक रियाजचा सहकारी होता. एनसीएने संबंधित रक्कम जप्त करून ब्रिटनच्या गृह मंत्रालयाला कळविले होते. आरोपी पाकिस्तानी नागरिक असल्याने ब्रिटनच्या सरकारने याची पूर्ण माहिती पाकिस्तानला सरकारला दिली होती. तेव्हा इम्रान खान हे पंतप्रधान होता. या प्रकरणाचा खुलासा करणारे फैजल वाबडा हे मंत्री होते, तर फैज हमीद हे आयएसआय प्रमुख होते.
ब्रिटनकडून प्राप्त 60 अब्ज रुपयांचा धनादेश प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा करण्यात आला. मग इम्रान आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. या प्रकाराला फैजल यांनी विरोध दर्शविला होता. यानंतर फैजल यांना इम्रान खान यांनी बाजूला सारले होते. अशा पार्श्वभूमीवत फैजल यांनी इम्रान यांचा पक्ष सोडला होता.
संबंधित प्रकरण दडपण्यासाठी जनरल फैज यांनी 5 अब्ज रुपयांची लाच स्वीकारली होती. फैज यांच्या लंडनवारीचा खर्च लँड माफिया मलिक रियाज करत होता असा आरोप वाबडा यांनी केला आहे. वाबडा यांनीच अल कादिर ट्रस्ट घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे.