सजविलेल्या बैलजोडय़ांचा सहभाग : गुलालाची उधळण, डॉल्बिच्या तालावर तरुणाई थिरकली
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त सजविलेल्या गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हनुमान जन्मोत्सव झाला नव्हता. परंतु यावषी कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे मोठय़ा उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. गुलालाची उधळण करत आकर्षक विद्युत रोषणाई केलेले गाडे व डॉल्बीच्या तालावर थिरकणारी तरुणाई असे वातावरण दिसून आले.
शनिवारी रात्री अनगोळमधील प्रमुख मार्गांवरून गाडे काढण्यात आले. रघुनाथपेठ, हणमण्णावर गल्ली, भांदुर गल्ली, राजहंस गल्ली, झेरे गल्ली, लोहार गल्ली व नाथ पै नगर येथून गाडे काढण्यात आले. शेतकरी बांधवांनी आकर्षक पद्धतीने बैलजोडय़ांना सजविले होते. या बैलजोडय़ांवर हनुमंताची मूर्ती बसविण्यात आली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करून पारंपरिक हलगी वादन व बँडच्या तालावर गाडे काढण्यात आले.
रविवारी दुपारी बैलजोडय़ांना सजवून हलगीच्या आणि डॉल्बीच्या दणदणाटात रघुनाथपेठ, लोहार गल्ली, हणमण्णावर गल्ली, राजहंस गल्ली या मंडळांनी मिरवणूक काढली. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत होती. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
रथ मिरवणूक उत्साहात
मारुती मंदिर रथ मिरवणुकीला रविवारी दुपारी सुरुवात झाली. गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते व पंच मंडळांच्या उपस्थितीत रथाची पूजा करण्यात आली. अनगोळमधील लोहार गल्ली, भांदुर गल्ली, जय महाराष्ट्र चौक, सुभाष गल्ली यासह प्रमुख मार्गांवरून रथ फिरविण्यात आला. यामध्ये युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
हनुमान मंदिरात जन्मोत्सव साजरा
रघुनाथपेठ अनगोळ येथील हनुमान मंदिरात शनिवारी पहाटे हनुमानाचा जन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर अलंकार घालण्यात आले. देवाला पाळण्यात घालून सुवासिनींनी पाळणा गीत गायिले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.