पणजी, मडगावात उद्या ’फाळणीच्या स्मृती’ जागविणारे प्रदर्शन
प्रतिनिधी/ पणजी
आझादी का अमृत महोत्सव निमित्त भाजपतर्फे देशभरात विविध कार्यक्रर्मांचे आयोजन करण्यात आले असून गोव्यातही 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी दिली.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सरचिटणीस दामू नाईक आणि प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर यांचीही उपस्थिती होती. हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात पंचायत पातळीवर भाजप कार्यकर्ते घरोघरी तिरंग्याचे वितरण करणार आहेत. त्याशिवाय अनेक मतदारसंघात तिरंगा यात्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रत्येक गोमंतकीयाने सहभागी व्हावे, असे आवाहन सावईकर यांनी केले.
दि. 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणीच्या स्मृती’ ना उजाळा देण्याच्या उद्देsशाने पाळण्यात येतो. त्यानिमित्त उत्तर आणि दक्षिण गोव्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता म्हापसा बसस्थानकावर चित्रप्रदर्शन होणार आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी त्याच वेळेत मडगाव येथे रविंद्र भवनमध्ये असेच प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रदर्शनाचा लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सावईकर यांनी केले.
त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता पणजीत चर्च चौक ते आझाद मैदान आणि मडगावात लोहिया मैदान परिसरात मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप युवा मोर्चा, स्थानिक आमदार, पक्ष कार्यकर्ते तसेच अन्य देशप्रेमी नागरिक त्यात सहभागी होणार आहेत. दोन्ही मोर्चा नियोजित स्थळी पोहोचल्यानंतर मान्यवरांची भाषणे होतील, असे सावईकर यांनी सांगितले.
दरम्यान, त्यावेळी बोलताना दामू नाईक यांनी, 18 दिवसांच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात सरकारने दाखविलेली कामगिरी प्रशंसनीय व कौतुकास्पद होती, असे सांगितले. या माध्यमातून ’गोव्याला स्वयंपूर्णतेकडे नेणारे सरकार’ असा एक वेगळा ठसा निर्माण करण्यात सरकार यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय ’सरकार तुमच्या दारी’ यासारख्या अभिनव योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यात तसेच प्रशासनातही सुटसुटीतपणा आणण्यात सरकारला यश आले आहे, असे ते म्हणाले. यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांचे भाजप अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.