गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची पोलीस अधिकाऱ्यांना सूचना : दंड न भरल्यास वाहने जप्त करा
बेळगाव : समाजहिताला धक्का पोहोचविणाऱ्या व अशांतता माजवणाऱ्या खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्ये समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली. सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष विभागाची पाहणी केल्यानंतर गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना वरील सूचना केली. आक्षेपार्ह माहिती, खोट्या बातम्या पसरवून समाजहिताला धक्का पोहोचविणाऱ्यांवर कसे लक्ष ठेवले जाते? याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू झालेल्या विशेष विभागात प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी पोलीस आयुक्तांना केली. याचवेळी वायरलेस विभाग व पोलीस रेकॉर्ड रूमला भेट देऊन गृहमंत्र्यांनी पाहणी केली. पोलीस कंट्रोल रूमला येणाऱ्या फोन कॉल्सची लॉगबुकमध्ये नोंद केली जाते. लॉगबुक व्यवस्थितपणे हाताळण्याची सूचना गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.
ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरला भेट
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड भरण्यासाठी सात दिवस मुदत द्यावी. त्यानंतर न्यायालयातून समन्स पाठविण्यात यावे. दंड भरला नाही किंवा न्यायालयातही हजर झाले नाहीत तर तशांची वाहने जप्त करण्याची सूचना त्यांनी केली. ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरला भेट देऊन नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना नोटिसा कशा पाठविल्या जातात, या प्रक्रियेची माहिती घेतली. बेळगाव शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. संबंधित नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्थित हाताळणी करण्याची सूचना केली. यावेळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी कामकाजाची माहिती दिली. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, नागरी हक्क विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र गडादी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.