वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिन्यात पुरुष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. इंग्लंडचा नवोदित हॅरी ब्रुक तसेच ऑस्ट्रेलियाची ऍश्ले गार्डनर यांची डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.
पुरुषांच्या विभागात या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये इंग्लंडचा हॅरी ब्रुक, पाकचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड यांचा समावेश होता पण 23 वर्षीय हॅरी ब्रुकने बाबर आझम आणि हेड यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. पाकविरुद्ध झालेल्या मालिकेत इंग्लंडने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. या मालिकेमध्ये हॅरी ब्रुकची कामगिरी दर्जेदार झाली. मधल्या फळीतील जॉनी बेअरस्टोच्या गैरहजेरीत हॅरी ब्रुकने आपली जबाबदारी चोकपणे पार पाडली. रावळपिंडीमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात हॅरी ब्रुकने पहिल्या डावात 153 तर दुसऱया डावात 87 धावा झळकवल्या होत्या. ब्रुकने या सामन्यातील आपले शतक केवळ 116 चेंडूत नेंदवले होते. त्यानंतर त्याने या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात आणखी दोन शतके नोंदवली. 17 वर्षानंतर पाकच्या भूमीवर इंग्लंडने ही मालिका एकतर्फी जिंकली होती. हॅरी बुकला या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत ब्रुकने 7 डावात 79.33 धावांच्या सरासरीने 238 धावा जमवित मालिकावीराचा बहुमानही पटकावला. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैद्राबादने हॅरी बुकला 13.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरची आयसीसीच्या डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी निवड करण्यात आली आहे. तिने भारताविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. ऍश्ले गार्डनरने आयसीसीतर्फेचा हा मासिक पुरस्कार पहिल्यांदाच मिळवला. तिने भारताविरुद्धच्या मालिकेत फलंदाजीत एकूण 115 धावा तर गोलंदाजीत 18.28 धावांच्या सरासरीने 7 गडी बाद केले.