थलैवाजविरुद्ध 27-22 फरकाने विजयश्री, मनजीत-जयदीप विजयाचे शिल्पकार
बेंगळूर / वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीत हरियाणा स्टीलर्सने तमिळ थलैवाजविरुद्ध 27-22 फरकाने बाजी मारत या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. ही लढत बेंगळुरातील श्री कंटिरवा इनडोअर स्टेडियमवर खेळवण्यात आली.
स्टीलर्सतर्फे रायडर मनजीत दहियाने सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली तर अष्टपैलू नितीन रावतने देखील हरियाणा स्टीलर्सतर्फे उत्तम फॉर्म कायम राखला. जयदीपने बचावात लक्षवेधी योगदान देत सुपर-5 ची नोंद केली.
मनजीतने यशस्वी चढाई करत स्टीलर्सला उत्तम सुरुवात करुन दिली. मात्र, त्यानंतर एकाच मिनिटात राईट कॉर्नरवरील सागरने त्याला बाद केले आणि तमिळ थलैवाजने आघाडी घेतली. मनजीतने 8 व्या मिनिटाला बचावातील स्कील्स दाखवत अजिंक्य पवारला टॅकल केले.
तमिळ थलैवाजच्या साहिल गुलियाने स्विफ्ट टॅकलच्या बळावर मनजीतला बाद केले. पण, नितीन रावतने बचावात उत्तम कामगिरी साकारली. पहिल्या सत्रातील काही मिनिटांचा खेळ बाकी असताना स्टीलर्सने थलैवाजला ऑलआऊट करत सत्राअखेर 15-9 फरकाने आघाडी मिळवली.
दुसऱया सत्रात पिछाडीवरील थलैवाजने गुणांची तफावत कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नरेंदरने रेड पॉईंट मिळवला तर सागरने के. प्रपंजनला टॅकल केले. मिनिटभरानंतर मितूने सुपररेड मिळवला आणि जयदीपने डू-ऑर-डाय रेडमध्ये नरेंदरची पकड केली. यामुळे, स्टीलर्सची 6 गुणांची आघाडी कायम राहिली.
पिछाडीवर असताना देखील तमिळ थलैवाजने उत्तरार्धातही बचावात्मक पवित्र्यावर भर देणे पसंत केले आणि याचा त्यांना फटका बसला. हरियाणा स्टीलर्सने याचा पुरेपूर लाभ घेत वर्चस्व अबाधित राखले.