उद्योग खात्री योजनेंतर्गत सोयीसुविधाकडे दुर्लक्ष : साहित्य न दिल्याने समस्या : कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी गरजेचे
बेळगाव : उद्योग खात्री योजना तशी गरिबांसाठी लाभदायक आणि फायदेशीर आहे. मात्र या योजनेतील कामगारांना जर नियमाप्रमाणे सर्व सुविधा मिळाल्या तर त्याचा फायदा होतो यात शंका नाही. काम नसल्यामुळे भत्ता देणे बंधनकारक आहे. याचबरोबर प्राथमिक उपचारासाठी औषधे, पाणी पुरवठा व टोप्या यासह इतर वस्तूही देणे बंधनकारक आहे. मात्र केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी होणारी घाईगडबड अनेकांना मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच अशी घटना कडोली येथे घडली. कामावर असताना अचानक एका महिलेला त्रास जाणवला. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्याचवेळी तेथेच जर त्या महिलेवर उपचार झाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. परंतु तसे झाले नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. उद्योग खात्रीमध्ये जिह्यात उद्दिष्टापेक्षाही अधिक काम करण्यावर भर दिला जातो. ही एका ?ष्टिने चांगली गोष्ट आहे. मात्र, कामगारवर्गाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मागील वेळीही उद्योग खात्रीचे काम करत असताना जाफरवाडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या गुरूवारी अशीच घटना कडोली येथे घडली आहे. तर जिल्ह्यातील अनेक भागांत अशा घटना घडत आहेत. त्यामुळे यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलून कामगारांच्या आरोग्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
कामगारांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये ग्राम पंचायतींनी उत्स्फूर्तपणे विविध कामे करून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या उद्योग खात्री योजनेचा लाभ घेत आहेत. काहीवेळा काम नसताना कामगार खाली बसतात. त्याचबरोबर पावसाला सुरूवात होताच आणि कडक उन्हात काम देण्यासाठी अधिकाऱ्यांची घाईगडबड सुरू होते. मात्र या उष्म्याचा त्रास वयोवृद्धांना होत असतो. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या दरम्यान कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
भर उन्हात कामगारांना काम देण्यात अधिकाऱ्यांची धन्यता
केंद्र सरकारने महात्मा राष्ट्रीय ग्रामीण उद्योग योजना सुरू केली आहे. ती प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यामुळे देशभरात याचा गवगवा होत असल्याचे दिसून येत आहे. योजनेंतर्गत दिलेले लक्ष्य जिह्यात पूर्ण करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात अधिक प्रमाणात कामगारांना काम दिले जाते. यापूर्वी सकाळच्या सत्रात काम देण्यात येत असल्याने कामगारांना उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळत होते. मात्र आता पुन्हा भर उन्हात कामगारांना काम देण्यातच अधिकारी धन्यता मानत आहेत. त्यामुळे अनेकांना याचा त्रास होवू लागला आहे. दरम्यान आरोग्य विभागाने उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. मात्र ते उद्योग खात्रीतील कर्मचाऱ्यांना लागू पडत नाहीत काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गांभीर्याने लक्ष देऊन सोयीसुविधा पुरवा
राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्रीतर्फे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व गावपातळीवर विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना विविध तलाव, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारीसह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष व त्यांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. तरी याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे व कामगारांना सोयीसुविधा पुरवाव्यात.