उपजिल्हाधिकाऱ्यांचा सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासनाला आदेश :5 दिवसात तारीख ठरविण्याची मुदत
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी परिषदच्या स्थापनेची तारीख ठरविण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कॉलेज प्रशासनाच्या व्यवस्थापनास पाच दिवसांची मुदत दिली आहे. येत्या 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान हा औपचारिक पदग्रहण सोहळा पार पाडावा, असे निर्देश दिले आहेत. मंगळवारी दि. 24 रोजी दुपारी बार्देश उपविभागीय दंडाधिकारी आयएएस यशस्विनी बी. यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासन व कॉलेज विद्यार्थी परिषदेच्या तीन विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बंद दाराआड बैठकीस शिक्षण खात्याचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांसमोर बोलताना सेंट झेवियर्स कॉलेजचा सरचिटणीस (जीएस) साहिल महाजन म्हणाले की, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसोबत आमची संयुक्त बैठक झाली. बैठकीत दंडाधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या व्यवस्थापनाला 24 जानेवारी ते 28 जानेवारी या पाच दिवसांत पदग्रहण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यास सांगितले आणि 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत हा औपचारिक पदग्रहण कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस कॉलेज जीएस साहिल महाजन, वर्ग प्रतिनिधी असलेले विनय राऊत, शिवानी वायंगणकर हे तिघेजण विद्यार्थी हजर होते, तर कॉलेज प्रशासनातर्फे प्राचार्य डॉ. ब्लैच मस्कारेन्हास, या कॉलेजचे व्यवस्थापक फादर टोनी, सालेमा व कॉलेजचे अॅडव्होकेट उपस्थित होते. याशिवाय पोलीस निरीक्षक परेश नाईक हे हजर होते. दरम्यान बैठक संपल्यानंतर माध्यमांनी कॉलेज प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित प्रतिनिधीनी प्रतिसाद दिला नाही. मी सरचिटणीस म्हणून जिंकून आलोय. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने औपचारिक कार्यक्रम घेत माझ्यासह विद्यार्थी परिषद मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा करावा अशी आमची मागणी होती. त्यानुसार हा उठाव केला होता. या पदग्रहण सोहळ्यास याआधीच 27 दिवसांचा विलंब झाला आहे. गोवा विद्यापीठाच्या नियमांनुसार दहा दिवसांत हे पदग्रहण होणे अनिवार्य असते, असे साहिल महाजन यांनी सांगितले ,आमचा लढा हा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. यात कुठलेही राजकारण नव्हते किंवा आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. आमची मागणी दंडाधिकाऱ्यांसमोर मांडली असून उपजिल्हाधिकाऱ्यांनी कॉलेज प्रशासन व्यवस्थापनास मुदत दिली. त्यानुसार दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे. कॉलेज व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यास आम्ही दंडाधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेणार, असेही साहिल महाजन म्हणाले. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्य ब्लांच खाली आल्या असता पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र त्या एकही शब्द न बोलता निघून गेल्या.