संचालकांच्या आठही जागांवर निवड, चौथ्यांदा विजयी
प्रतिनिधी/ सांगे
सांगेतील वाडे-कुर्डी येथील कुर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे संचालक मंडळ निवडण्यासाठी झालेल्या निवडणुकीत फ्रान्सिस (आयेतीन) मास्कारेन्हस यांच्या पॅनलची सरशी झाली असून सतत चौथ्यांदा त्यांचे पॅनल जिंकून आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच निवड होईल हे निश्चित आहे.
खुल्या गटातील एकूण आठ संचालक निवडण्यासाठीच्या निवडणुकीकरिता मास्कारेन्हस यांच्या पॅनलचे आठ तर एक विरोधात असे 9 अर्ज आले होते. शेवटपर्यंत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून अमेय धाकणकर यांनी काम पाहिले आणि त्यांना सचिव जगन्नाथ नाईक यांनी सहकार्य केले. धाकणकर यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यानुसार फ्रान्सिस मास्कारेन्हस यांना 463 मते, आलेक्स रॉड्रिग्स यांना 441 मते, सोनू पोरो गावकर यांना 444 मते, सुधाकर पेरणी यांना 438 मते, मिनीन आल्बुकर्क यांना 419 मते, संजय कुर्डीकर यांना 445 मते, प्रेमानंद नाईक यांना 460 मते, तर इनासियो रॉड्रिग्स यांना 416 मते प्राप्त होऊन ते विजयी ठरले आहेत. तर प्रशांत येवढकर यांना 162 मते प्राप्त होऊन त्यांना पराभव पत्करावा लागला. येवढकर यांना विजयासाठी 254 मतांची आवश्यकता होती.
यामुळे आठही संचालक फ्रान्सिस मास्कारेन्हस गटाचे निवडून आले आहेत. यापूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांवर आवडू बाबय गावकर आणि रिमा मंगलदास गावकर, तर अनुसूचित जाती/जमातांसाठी राखीव जागेवर तुकाराम रामचंद्र वेळीप यांची बिनविरोध निवड झालेली आहे. बिनविरोध निवडून आलेले हे तिन्ही संचालक मास्कारेन्हस यांच्या पॅनलचे आहेत. कुर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या मावळत्या संचालक मंडळात उपाध्यक्ष असलेले मनोज ना. पर्येकर, संचालक चंद्रकांत वेळीप आणि विनायक गावकर यांनी स्वखुशीने यंदाच्या निवडणुकीत भाग न घेता इतरांना संधी दिली होती. नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ 2022 ते 2027 पर्यंतच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.
बऱयाच काळापासून या सोसायटीवर फ्रान्सिस मास्कारेन्हस यांचे वर्चस्व असून संस्थेच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, निवडणूक होणार की, बिनविरोध संचालक मंडळ निवडले जाणार याची सभासदांना उत्सुकता होती. पण अखेर एक अर्ज जास्त आल्याने निवडणूक पार पाडली. एकूण 552 सभासदांनी मतदान केले. त्यापैकी 19 मते बाद ठरली. सभासदांनी आपल्या पॅनलवर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा काम आणि सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मास्कारेन्हस यांनी सर्व सभासदांचे मनापासून आभार मानले आहेत. संस्थेची भरभराट आणि सभासदांच्या सेवेसाठी आपण कार्यरत राहणार असून जो विश्वास दाखविण्यात आला आहे त्याला पात्र राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.