वेंगुर्ला नगरपरिषदेचा उपक्रम
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला नगरपरिषद आणि आपला दवाखाना, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी आपला दवाखाना, वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा दैनंदिन चेकअप, रक्ताच्या विविध चाचण्या व इतर आरोग्य विषयक तपासण्या करुन त्यांना आवश्यकतेनूसार औषधे देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (एम.ओ.एच.यु.ए.), भारत सरकार यांनी दि. १५ सप्टेंबर २०२३ ते दि. २ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करणेबाबत सुचित केलेले आहे. यास अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सफाई मित्र यांच्याकरीता सेवा व सुरक्षा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
वेंगुर्ला नगरपरिषदेकरीता स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणाऱ्या तसेच नगरपरिषदेस प्राप्त होणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छता विषयक विविध कामे करताना सफाई कर्मचाऱ्यांना रोगराईची लागण होऊ शकते, यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यास अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सफाई कर्मचाऱ्यांकरीता या प्रकारची आरोग्य तपासणी शिबीरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी सांगितले.