देहू : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या (दि. 10) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळय़ास हजारो वारकरी सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर सोहळय़ातील वारकरी आणि भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने यंत्रणा सज्ज आहे. शहरात प्रमुख पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू केले आहेत. तसेच सात अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून मुबलक औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच सात वैद्यकीय अधिकारी आणि तीस आरोग्य कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध आहेत. जलजन्न आजार रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी 29 ठिकाणचे पाणी स्रोतांचे नमुने घेण्यात आले आहेत. विहिरींच्या पाण्याची तपासणी केली आहे. भाविकांना काही भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या टँकरवर एक वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात येणार आहे. गावातील हाटेल चालकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाणी शुद्ध करण्यासाठी मेडिक्लोअरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे. किटकजन्य आजार रोखण्यासाठी गावातील गटारांची स्वच्छता सुरू आहे.
तसेच बीएचसी, धुराची फवारणी करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीतील पाणी स्वच्छ राहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग- मुख्य मंदिर, गाथा मंदिर आणि वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार येथे ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
– अशी आहे तयारी
– प्राथमिक आरोग्य केंद्रात चोवीस तास रुग्णांसाठी व्यवस्था – 7 वैद्यकीय अधिकारी, 6 आरोग्य सहाय्यक, 13 आरोग्य सेवक, 7 आरोग्य सेविका असे एकूण 30 कर्मचारी
– 15 प्रशिक्षणार्थी डाक्टर नियुक्त
– 7 रुग्णवाहिका उपलब्ध
– साप, कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी लस उपलब्ध
– गावात पालखी मार्ग, वैकुंठ मार्ग, ग्रामपंचायत मार्ग, माळवाडी, विठ्ठलवाडी मार्गावर आरोग्यपथके तयार
– चोवीस तास वीजपुरवठा
– पावसाचे दिवस आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वारीत वीजपुरवठा चोवीस तास ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने तयारी केली आहे.