वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तराखंडच्या जोशीमठमधील संकटाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करणाऱया याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिब यासारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळांचे प्रवेशद्वार असलेले जोशीमठ सध्या जमीन खचत चालल्याने मोठय़ा आव्हानाला सामोरे जात आहे. पूर्ण शहर हळूहळू खचत चालले असून घरांच्या भिंती, रस्त्यांना मोठमोठय़ा भेगा पडत आहेत. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस. नरसिंह तसेच जे.बी. पर्दीवाला यांचे खंडपीठ अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून दाखल याचिकेवर सुनावणी करणार आहे. जोशीमठमधील संकट हे मोठय़ा प्रमाणावरील औद्योगिकीकरणामुळे निर्माण झाल्याचा दावा करत उत्तराखंडच्या लोकांना तत्काळ आर्थिक मदत अन् भरपाई देण्याची मागणी याचिकेत आहे. तसेच या आव्हानात्मक काळात जोशीमठच्या रहिवाशांना सक्रीय स्वरुपात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.