अश्विन शिंदेंकडे तात्पुरता पदभार
बेळगाव : हेस्कॉमला शहर कार्यकारी अभियंतापदी कायमस्वरुपी अधिकारी मिळत नसल्याने याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने तात्पुरता पदभार शहर उपविभाग-3 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु, शहराला कायमस्वरुपी अभियंता द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार यांची शिरसी येथे बदली झाली. यामुळे रिक्त असलेल्या पदावर अश्विन शिंदे यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु, कायमस्वरुपी नेमणूक नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच शिंदे यांच्याकडे शहराच्या उत्तर भागातील जबाबदारी असल्याने त्यांना यासोबतच शहराचा भार वहावा लागणार आहे. त्यामुळे हेस्कॉमने शहर कार्यकारी अभियंतापदी कायमस्वरुपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी हेस्कॉमचे ग्राहक तसेच कंत्राटदारांमधून केली जात आहे.
कार्यकारी अभियंता पदासाठी जोरदार लॉबिंग
शहर कार्यकारी अभियंता पद रिक्त झाल्याने हेस्कॉममधील अनेक वरिष्ठ या जागेसाठी प्रयत्नशील आहेत. नियमानुसार कार्यकारी अभियंता हे पद अभियांत्रिकी पदवीधारक व्यक्तीला देणे गरजेचे असते. त्यामुळे शहर विभागात कार्यरत असणाऱ्या संजीव हम्मण्णावर, विनोद करुर, अरविंद गदगकर व अश्विन शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अश्विन शिंदे हे डिप्लोमाधारक असल्याने सध्या चर्चेला उधाण आले आहे. कार्यकारी अभियंता पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून यामध्ये बाजी कोण मारणार? हे पहावे लागणार आहे.