ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या मंगळवार पेठेत असलेल्या जुना बाजारातील दुकांनाना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 10 ते 12 दुकानं आणि झोपडपट्टीतील काही घरे आगीत जळून खाक झाली.
जुना बाजार परिसरात इलेक्ट्रिक आणि लाकडी फर्निचरची दुकानं आहेत. सकाळी आठच्या सुमारास अचानक या दुकानांना आग लागली. काही क्षणातच आगीने उग्ररुप धारण केले. त्यानंतर इतर दुकानंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीपर्यंत ही आग पोहचली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 10 ते 12 दुकानं आणि काही घरं आगीत जळून खाक झाली आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.