मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ : तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान
खानापूर : खानापूर परिसरात शनिवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले असून वातावरणात पूर्णपणे बदल झाला असून हवेत गारठा निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पूर्णत: पाठ फिरविली होती. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वातावरण पूर्णपणे कोरडे होते. आणि कडक ऊन पडत होते. त्यामुळे सर्वच पिके वाळून गेली होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्या. पुन्हा रविवारी सकाळपासूनच हा पाऊस पडत होता. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असून हवा मात्र पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तालुक्यात सर्वच पिकांसाठी मोठ्या व जोरदार पावसाची गरज आहे. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून येत्या दोन-चार दिवसात मोठा पाऊस झाल्यास कशीबशी जगलेल्या भात पिकांना दिलासा मिळणार आहे.
सध्या माळरानावरील भातपीक पोसवण्याच्या स्थितीत आहे. या भात पिकास पावसाची अत्यंत गरज आहे. येत्या काही दिवसात पाऊस होणे गरजेचे आहे. एकदा भात पोसवण्यास सुरुवात झाल्यानंतर जर पाऊस पडला तरी हातातोंडाशी आलेले भातपीकही वाया जाणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने नदी नाल्यांची पातळी पूर्णपणे खालावली होती. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या हलक्या पावसामुळे नदीपात्रातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे खात्याने तालुक्यातील काही बंधाऱ्यांतून सहा फुटापर्यंत पाणी अडवले आहे. त्यामुळे होणाऱ्या पावसामुळे पाणी अडवलेल्या बंधाऱ्यांच्या ठिकाणाहून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे खाते सतर्क झाले असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांतून पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जांबोटी-कणकुंबीसह घाटमाथ्यावर पाऊस
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी, कणकुंबीसह संपूर्ण परिसरात व घाटमाथ्यावर शनिवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. तसेच तालुक्यातील नंदगड, गुंजी, लोंढा यासह नागरगाळी भागातही सर्वत्र पावसाला सुरुवात झाल्याने नदी नाल्यांच्या पातळीत एकदमच वाढ झाली आहे. मात्र सध्या होणाऱ्या पावसाचा भातपिकाला काहीही उपयोग होणार नसून जी भातपिके वाळून गेली आहेत. त्यांना या पावसाचा काहीही उपयोग होणार नसून जी भातपिके पोसवायच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्या भात पिकालाही नुकसानदायकच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.