प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांसाठी सहायता केंद्रे स्थापन करण्याचे पर्यटन खात्याने ठरविले आहे. कोकण रेल्वे स्टेशन-मडगांव, दाबोळी विमानतळ, मोपा विमानतळ, पणजी बसस्थानक या चार ठिकाणी पहिल्या टप्प्यात केंद्रे सुरू होणार असून नंतर इतर ठिकाणी त्यांचा विस्तार केला जाणार आहे. तेथे हॉटेल्स व इतर आरक्षणाची सोयही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
त्या केद्रांच्या कार्यवाहीसाठी खात्यातर्फे एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या केंद्रातून पर्यटकांना योग्य माहिती देण्यात येणार असून त्यांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्या केंद्रातून इंटरनेट, वाय फाय सेवा देखील पर्यटकांसाठी मिळणार आहे.
गोव्यात विविध ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळावर कसे जावे-यावे याची माहिती केंद्रातर्फे देण्यात येणार आहे. ही केंद्रे 24×7 खुली रहाणार असून तेथे किमान 2 कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. चांगले संभाषण करणारे कर्मचारी तेथे देण्यात येणार असून मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी व इतर भाषा जाणणाऱ्यांना तेथे प्राधान्य मिळणार आहे.
राज्याची परिपूर्ण महिती त्या केंद्रातून पर्यटकांना देण्यात येणार असून पर्यटकांची कुचंबणा, फसवणूक होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. हॉलिडे पॅकेज, जलक्रीडा, महोत्सव पासेस याचीही सेवा त्या केंद्रातून देण्याचे नियोजन आहे. केंद्रामार्फत ऑडीयो-व्हिडियो पर्यटकांना पुरवण्यात येणार असून ते विविध भाषांतून असतील, असे सुत्रांनी नमूद केले.