‘सीपीआर’च्या डे केअर सेंटरमध्ये तपासणी, आजपर्यत 50 हजार युनिट फॅक्टरचा वापर, जिल्ह्यात नोंदणीकृत 400 हिमोफिलियाग्रस्त मुले, अनुवंशिक आजारावर उपचाराद्वारे नियंत्रण
कृष्णात पुरेकर कोल्हापूर
हिमोफिलिया अनुवंशिक आजार. जिल्ह्यात नोंदणीकृत 400 रुग्ण.. सीपीआर हॉस्पिटलमध्ये पावणेदोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी डे केअर सेंटर सुरू झाले. अन् त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला. एका हिमोफिलियाग्रस्तासाठी औषधोपचाराचा महिन्याचा खर्च सरासरी 25 ते 30 हजार रुपये आहे. पण ‘सीपीआर’मध्ये या रुग्णांवर मोफत औषधोपचार होत आहेत. आजपर्यत फॅक्टर 8 व 9 वाढीसाठी त्यांच्यावर 50 हजार युनिट इंजेक्शनचा वापर झाला आहे. हिमोफिलिया अनुवंशिक आहे, त्यामुळे जनजागृती अन् विवाहपूर्व रक्त तपासणी आवश्यक बनली आहे.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया संघटनेने 1989 मध्ये 17 एप्रिल हा दिवस वर्ल्ड हिमोफिलिया डे म्हणून घोषित केला. हिमोफिलिया आणि अन्य अनुवंशिक रक्तस्राव विकारासंदर्भात या दिवशी जागृती केली जाते. हिमोफिलिया म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील घटकांचा अडथळा. एखाद्याला किरकोळ दुखापतीनंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. परिणामी अतिरक्तस्रावामुळे त्याच्या जिविताला धोका वाढतो. यात फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 यांची भूमिका महत्वाची असते.
सामान्य व्यक्तींमध्ये रक्त गोठण्यासाठी आवश्यक 12 घटक असतात. त्यापैकी फॅक्टर 8 हा हिमोफिलिया घटक एक्स लिंग गुणसुत्रांवर असतो. यात फॅक्टर 8 अक्षम असल्यास अशी व्यक्ती हिमोफिलियाची वाहक बनते. महिलांमध्ये दोन एक्स गुणसुत्रे असल्याने त्यापैकी एकात हिमोफिलिया वाहक असल्याने फॅक्टर 8 पुरेशा प्रमाणात तयार होतो. परंतु तिच्या मुलांमध्ये एक्स गुणसुत्र पेशी विभाजनावेळी गेल्यास बाळाला हिमोफिलिया होतो. त्यांच्यात रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटकाचा अभाव राहतो, परिणामी साध्या जखमेमुळेही रक्तस्राव अधिक होतो, म्हणून याला अनुवंशिक लिंग गुणसुत्र विकृती म्हणून ओळखले जाते.
जिल्ह्यात नोंदणीकृत हिमोफिलियप्ग्रस्त 400 मुले आहेत. त्यांच्यावरील उपचारांचा खर्च अधिक होता, परिणामी शासनाने या मुलांवरील उपचार मोफत केले. ‘सीपीआर’मध्ये ऑगस्ट 2021 मध्ये हिमोफिलियाग्रस्त मुलांसाठी डे केअर सेंटर सुरू झाले. येथे तपासणीसाठी येणाऱ्या मुलांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत 5 टक्के वाढ झाली आहे. दीड वर्षांत या मुलांना 50 हजार युनीट फॅक्टर दिल्याची माहिती हॉस्पिटलमधील हिमॅटलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना यांनी दिली.
हिमोफिलिया सोसायटी ऑफ कोल्हापूर संस्थेने हिमोफिलियासंदर्भात जागृती सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येकाने विवाहपूर्व रक्ततपासणी करावी, याच्या प्रबोधनाचा समावेश आहे. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या प्रयत्नातून हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरू झाले. दरम्यान, शालेय स्तरावर ‘आरबीएसके’ अंतर्गत हिमोफिलियाची तपासणी झाल्यास अशा लपलेल्या रूग्णांनाही दिलासा देणे शक्य असल्याचे डॉ. वरूण बाफना यांनी स्पष्ट केले.
हिमोफिलिया हा रॉयल डिसीज आहे. इंग्लंड आणि रशियन राजघराण्यात पितृ विवाह नात्यातून याचे संक्रमण झाले होते. हिमोफिलिया जनूक वाहक मातेकडून तिच्या मुलांमध्ये गेल्याने ती हिमोफिलियाग्रस्त बनतात. त्यांच्यातील हिमोफिलिया जनूक कन्येकडे संक्रमित होते, परंतु ती वाहक बनते. हिमोफिलियाग्रस्त पुरूषाची मुले हिमोफिलियाची शिकार होत नाहीत, मात्र त्याच्या मुली वाहक ठरतात. मातेकडून मुलाकडे अन् पित्याकडून कन्येकडे होणाऱ्या या संक्रमणाला नागमोडी अनुवंशिकता अर्थात हिमोफिलिया म्हटले जाते.