धोकादायक झाडांच्या फांद्या हटविल्या :विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यासह ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती
बेळगाव : गणेशोत्सवापूर्वी शहरातील विद्युतवाहिन्यांसाठी धोकादायक ठरलेल्या झाडांच्या फांद्या हटविणे, तसेच इतर दुरुस्तीचे काम हेस्कॉमने हाती घेतले आहे. रविवारी शहराच्या उत्तर भागातील बऱ्याचशा भागात वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यादृष्टीने हेस्कॉमने आतापासूनच पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव महामंडळ, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युतवाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. काही ठिकाणी विद्युतवाहिन्या लोंबकळत असून गणेशमूर्तींची ने-आण करणे गैरसोयीचे होणार असल्याने वेळेत दुरुस्तीची मागणी केली होती. याचबरोबर काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत असून त्यामधून तेलगळतीही होत आहे. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणांची माहिती घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा बंद असेल, असे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद होता. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युतवाहिन्यांवर लोंबकळत असल्यामुळे त्या दूर करण्यात आल्या. याचबरोबर विद्युतवाहिन्यांची उंची वाढविणे, ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, विकेंड असतानाही नागरिकांना विजेविना दिवस घालवावा लागला.