कोणत्याही स्थानी कोणती वेषभूषा करायची, हे कित्येकदा ठरलेले असते. ही पंरपरा कोणी मोडली तर ते कित्येकांना आवडत नाही. कित्येकदा एखादे काम करताना, त्या कामाला अनुकूल ठरेल अशी वेषभूषाच करावी लागते. अन्यथा ते काम व्यवस्थित करता येत नाही. उदाहरणार्थ, आपण मशिनवर काम करत असलो तर आपल्याला ते काम सुलभपणे करता येईल, असाच पोषाख करावा लागतो.
तथापि, काहीजण आपले वेगळे वैशिष्टय़ जगाला दाखविण्यासाठी अशा परंपरा मोडतात. जपानमधील प्रसिद्ध शिंपी आणि ऍडव्हेंचरर नोबुटाका सादा यांनी असाच एक पराक्रम केला आहे. त्यांनी चक्क सुटाबुटाच्या वेषभूषेत गिर्यारोहण करुन प्रसिद्धी मिळविलेली आहे. वास्तविक, गिर्यारोहणासाठी सूट आणि बूट ही वेषभूषा योग्य मानली जात नाही. त्यासाठी वेगळी वेषभूषा असते, जी गिर्यारोहणासाठी अनुकूल असते. पण सादा यांना काहीतरी नवे करुन दाखवायचे होते.
त्यांना सुटाबुटात पर्वताच्या शिखरावर पाहून तेथे असलेल्या गिर्यारोहकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांनी याचे कारण त्यांना विचारले. सादा यांच्याकडे त्याचे चपखल कारणही होते. आपल्या टेलरिंगच्या व्यवसायाची जाहीरात करण्यासाठी आपण या वेषभूषेत गिर्यारोहण केले, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण शिवलेल्या वेषात गिर्यारोहणासारखीं अवघड कृतीही करता येते. ती करताना कोणतेही अडचण येत नाही, किंवा असुरक्षिता वाटत नाही, हे आपल्याला सिद्ध करायचे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे ऍडव्हेंचर लोकप्रिय होत आहे.