ग्राम पंचायत कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी : प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार आज बेळगावात
प्रतिनिधी /बेळगाव
कंत्राटदार संतोष पाटील (वय 35) आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उडुपी पोलिसांनी बेळगावात तळ ठोकला आहे. सोमवारी हिंडलगा ग्राम पंचायतीला भेट देऊन दिवसभर ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात झालेल्या कामांची माहिती घेतली. सायंकाळपर्यंत पोलीस पथकातील अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करीत होते.
मलपेचे पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सोमवारी सकाळी ग्राम पंचायत कार्यालयाला भेट दिली. पीडीओ वसंतकुमारी यांची चौकशी करण्यात आली. विकासकामांविषयी पंचायत कार्यालयातील कागदपत्रांचीही अधिकाऱयांनी पडताळणी केली.
ग्रामदेवता लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुमारे 4 कोटी रुपये खर्चून 108 कामे केली होती. या कामांची बिले मंजूर करण्यास 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करीत कंत्राटदार संतोष पाटील यांनी गेल्या मंगळवारी 12 एप्रिल रोजी उडुपी येथे विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.
मंजुरी नसताना 4 कोटींची कामे कशी केली?
उडुपी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराचे मूळ गाव असलेल्या बडस के. एच. ला भेट देऊन त्यांची पत्नी, आई व भावाची जबानी घेतली होती. सोमवारी हिंडलगा ग्राम पंचायतीला भेट दिली. वर्कऑर्डर किंवा कसलीही मंजुरी नसताना विश्वासावर ही कामे राबविण्यात आली आहेत. त्याची पोलिसांनी पाहणी केली. मंजुरी नसताना 4 कोटींची कामे कशी करण्यात आली? असा प्रश्न पोलीस पथकातील अधिकाऱयांनी विचारला.
डी. के. शिवकुमार आज बेळगावात
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे मंगळवारी बेळगाव दौऱयावर येत आहेत. दुपारी 3 वाजता कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. आत्महत्येच्या घटनेनंतर दुसऱयाच दिवशी डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी संतोषच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. आठवडाभरात शिवकुमार दुसऱयांदा त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बेळगावला येत आहेत.
प्रताप रेड्डी यांनी घेतली पोलीस पथकाकडून माहिती
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उडुपी पोलिसांचे एक पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी बेळगावात तळ ठोकून आहे. सोमवारी अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांनीही बेळगावला भेट देऊन तपास पथकाकडून माहिती घेतली.
हुबळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी सोमवारी हुबळीला आले होते. हुबळी येथे पाहणी करून दुपारी ते बेळगावला आले. उडुपी व बेळगाव येथील पोलीस अधिकाऱयांनी त्यांची भेट घेतली.
पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील उडुपी पोलिसांच्या एका पथकाने संतोष पाटीलचे मूळ गाव असलेले बडस के. एच. व त्यांनी विकासकामे राबविलेल्या हिंडलग्याला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांना हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर आदी स्थानिक अधिकाऱयांनीही साथ दिली आहे.
या प्रकरणाचा तपास प्रताप रेड्डी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सुरू असून सात पथके कार्यरत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उडुपी पोलिसांनी जमवलेल्या माहितीवर खासगी विश्रामधाम येथे त्यांनी अधिकाऱयांशी चर्चा केली.