मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीयांचे शिवाजी महाराजांवर फार प्रेम आहे. गोव्यातील आठ तालुके त्यांच्या अधिपत्याखाली होते. गोव्यात हिंदू संस्कृतीचे जतन शिवाजी महाराज व संभाजी महाराजांमुळे झाले असे नमूद करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, शिवराज्याभिषेक झाला त्या दिनाचे औचित्य साधून वा. सी. बेंदे यांच्या ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन होत आहे याचा मोठा आनंद वाटतो. हा अभिमानाचा क्षण आहे. हा इतिहास अभ्यासकांसाठी,राष्ट्रासाठी मोलाचा आहे असे गौरोदगार येथे काढले.
इतिहासाचार्य वा. सी. बेंदे यांच्या पुनर्प्रप्रकाशित सहा ग्रंथांचा प्रकाशन सोहळा सोमवारी मराठी देशा फाऊंडेशनने इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाच्या सहयोगाने आयएमबी च्या परिषदगृहात पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते, मालोजीराजे आणि शहाजी महाराज,शिवाजी महाराज पूर्वार्ध, शिवाजी महाराज उत्तरार्ध, संभाजी महाराज, राजाराम महाराज व शिवराज्याभिषेक या सहा ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मराठी देशा फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.दामोदर नाईक, इतिहासाचार्य बेंदे यांच्या नात साधना बेंदे, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब व अमर जाधव उपस्थित होते. संतोष पालयेकर आणि साथी कलाकारांनी गायिलेल्या पोवाडय़ाने सोहळय़ाला प्रारंभ झाला. त्यानंतर पाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पा?जली वाहिली. दशरथ परब यांनी स्वागत केले. डॉ. दामोदर नाईक यांनी ग्रंथांविषयी उहापोह केला. गोव्यातील शालेय ग्रंथालयांना बेंदे यांच्या ग्रंथांचा संचय भेट देण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. आयएमबी उपाध्यक्ष गोरख मांदेकर यांनी आभार मानले.