नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी।
गुणी च गुणरागी च विरल: सरलो जन:
सरलार्थ- गुणहीन लोकांना (दुसऱ्यांमधले चांगले) गुण ओळखताच येत नाहीत आणि गुणवंत लोकांना (दुसऱ्या) गुणवंतांचा हेवा वाटतो. (त्यामुळे तो ते मान्य करत नाही.) स्वत: गुणवान असून दुसऱ्या गुणवंताची कदर करणारे सज्जन दुर्मिळ असतात. हे सुभाषित वाचलं आणि संस्कार भारतीच्या श्री वाकणकर यांचं जीवन चरित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. 1957 साली आगगाडीने नागपूरला निघालेले हरिभाऊ भोपाळ स्टेशन गेल्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबली असताना ते सहज बाहेर बघत होते. बाहेर लांब मोठ मोठ्या टेकड्या आणि त्याच्यावर असलेले वेड्यावाकड्या आकाराचे प्रचंड दगड त्यांनी पाहिले आणि कुतूहल म्हणून शेजारच्या प्रवाशाला विचारले की हे नेमकं काय आहे. हा कसला डोंगर आहे. त्या वेळेला त्या लोकांनी या भागाला भीमबेटका असे म्हणतात. बाकी त्यांना काही फारसं सांगता आलं नाही. त्यानंतर जिथे गाडी थांबली. तिथे उडी मारून पुढचा पायवाटेचा रस्ता हरिभाऊनी पकडला आणि भीमबेटकापाशी ते दाखल झाले आणि खरोखरच अवर्णनीय गुहा सापडावी तशी त्यांची अवस्था झाली. प्राचीन काळी ज्या गुणी कलाकारांनी काढलेली चित्र या ठिकाणी त्यांना पहायला मिळाली. ती चित्रे अभ्यासणे, त्यावेळच्या सांस्कृतिक तपशीलाची नोंद, पेन्सीलने स्केच करणे हा त्यांचा क्रम होता. हा विद्वान कलाकार अभ्यासक तथा संशोधक त्या ठिकाणी आता सतत जाऊन येऊ लागला होता. भारतीय पुरातत्व खात्यालाच एक आगळीवेगळी दिशा देणारे हे संशोधक या चित्रांचा कालखंड ठरवू शकले आणि भारतीय इतिहासात एक मानाचं पान निर्माण झालं. जगामध्ये कित्येक वर्ष जुनी असलेली सर्वात प्राचीन कला आमच्या भारतात आहे हे आम्ही जगाला ठासून सांगू शकलो ते हरिभाऊ मुळेच. यासाठी या हट्ट योग्याला उग्र तपश्चर्या करायला लागली. लोकांचे अपमान सहन करायला लागले आणि सतत धावपळ करायला लागली पण तरीही एका गुणी चित्रकाराची कला सगळ्या जगापर्यंत नेण्याचा मान त्यांना मिळाला. भीमबेटकातल्या 400 हून अधिक गुहांमध्ये दडलेल्या हजारो चित्रांचा अभ्यास केला. जिथे किमान 1 लाख वर्षे सातत्याने मानवी अस्तित्व असल्याचे दाखले मिळतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे सहस्रावधी चित्रे असणारी ही जगातील एकमेव गुहा असल्यामुळे याच्या अभ्यासाचं याच्या सगळ्या चित्र वर्णनाचं श्रेय हरिभाऊ वाकणकरांना जातं. पाषाणातील कोट्यावधी वर्षांच्या विघटन प्रक्रियेतून तयार झालेल्या महाकाय शिळा आणि त्याच्यावर असलेली ही चित्रे म्हणजे आमच्या भारताचा आदर्श इतिहासच ठरतो.