खासदार आण्णासाहेब जोल्ले यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे राणी चन्नमा उत्सवाला प्रारंभ, कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /काकती
काकतीला राणी चन्नम्मांचा ऐतिहासिक वारसा असून हा तिच्या माहेराचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करण्यासाठी वर्षभरात विकासकामे हाती घेणे आवश्यक आहे. केवळ आश्वासन न देता माझ्या खासदार निधीतून 25 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवारी राणी चन्नम्मा उत्सव मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी जोल्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर होते. राचय्या महास्वामी व उदय हिरेमठ यांचे सानिध्य यावेळी लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात नाडगीताने झाली. स्वागत व प्रस्तावना प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांनी केले. व्यासपीठावर जिल्हा पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर, हिंडाल्को इंडस्ट्रीजचे युनिट हेड अभिजित भंडे, एच. आर. मॅनेजर विश्वास शिंदे, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, तहसीलदार आर. के. कुलकर्णी उपस्थित होते. आण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे जोल्ले म्हणाले, काकती विकासाकरिता राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रा. प्रवीण पॅटी, मारुती अष्टगी यांनी राणी चन्नम्मा स्वातंत्र्य लढय़ाचा विचार मांडला.
डॉ. एस. डी. पाटील, जि. पं. माजी सदस्य सिद्दगौडा सुणगार, ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर, राचय्या महास्वामी आदींनी काकतीचा देसाईवाडा खरेदी करावा, ढासळलेल्या किल्ल्याचा विकास करावा, अशा मागण्या केल्या.
सकाळी 9 च्या सुमारास खासदार आण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, ग्रा. पं. अध्यक्ष सुणगार यांच्या हस्ते फुगे व कबूतर आकाशात सोडून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रस्त्यावरील गावच्या प्रवेशद्वारातून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, राजवाडय़ातील दरबार, इंग्रज अधिकारी यांच्या वेषभूषेतील मुले-मुली आकर्षक ठरली होती. झांजपथक व विविध वाद्यवृंदासह निघालेल्या चित्ररथ मिरवणुकीत मान्यवरांसह हजारो नागरिक, महिला सहभागी झाले होते. तसेच डोक्यावर कुंभकलश घेऊन सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. राणी चन्नम्माच्या पुतळय़ाचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुतळय़ाला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक स्वामी, भाजप युवा नेते बसवराज हुंद्री, आपय्या झांजरी, रामा चिरमुरी, बाबासाहेब देसाई, नाना टक्केकर आदी उपस्थित होते.
राणी चन्नम्मा हॉस्पिटलची विशेष मागणी
सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा धोणजी यांनी राणी चन्नम्मा यांच्या नावे सुसज्ज हॉस्पिटलची मागणी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे केली. यासाठी ग्रामपंचायतीने जागेची पूर्तता करावी, असे खासदारांनी त्यांना सूचविले. त्याबरोबर एक-दोन कार्यकर्ते मराठी माणसांना डावलून चन्नम्मा उत्सवात मनमानी करीत असल्याने मराठी समाज बांधव नाराज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.