पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील तासवडे टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला एका पोलिसाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने गृहरक्षक दलात प्रचंड नाराजी पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत होमगार्डने दिलेल्या तक्रारीत 21 मार्चला सकाळी त्यांची तासवाडे टोल नाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. वेळेत न पोचल्यामुळे तेथे नियुक्त असलेल्या हवालदार यांनी मला अर्वाच भाषेत शिवीगाळ केली. तसेच दमदाटी देखील केली.मी त्यांना असं बोलू नका म्हटल्यावर त्यांना मला मारहाण केली. या प्रकाराने गृहरक्षक दलामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.