बेळगाव : गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सोमवारी दुपारी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांना धक्का दिला. आपल्या या भेटीत त्यांनी तब्बल एक तासाहून अधिककाळ कारागृहात फेरफटका मारून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून धमकीचा फोन गेल्यानंतर कारागृह ठळक चर्चेत आले होते. त्यानंतरही काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आटोपून त्यांनी कारागृहाला धडक मारली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारीही गृहमंत्र्यांसमवेत होते. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी कारागृहातील कामकाजाबद्दल माहिती दिली. यावेळी कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष हेही उपस्थित होते.
कारागृहातील प्रत्येक विभागाला भेटी देऊन कैद्यांची विचारपूस केली. अतिसुरक्षित अशा अंधेरी विभागाचीही गृहमंत्र्यांनी पाहणी केली. कैद्यांना भेटण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडूनही माहिती घेतली. कारागृहात कोणत्याही परिस्थितीत गैरप्रकारांना थारा देऊ नये, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. कारागृहाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, हिंडलगा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशकालीन आहे. अंदमान व हिंडलगा कारागृहात बरेच साम्य आहे. अलीकडे कारागृहासंबंधी आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आपण अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. कारागृहाचे आधुनिकीकरण करण्याचा विचार आहे. नवे कॅमेरे, 5-जी मोबाईल जामर लावण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. अद्याप बायोमेट्रिक हजेरीही येथे नाही. जुन्या पद्धतीनेच हजेरी पुस्तकात सही केली जाते. यामध्ये बदल करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनासाठी साडेतीन हजार पोलीस…
4 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचाही आढावा घेतला. अधिवेशन बंदोबस्तासाठी साडेतीन हजारहून अधिक पोलिसांचे नियोजन करण्यात येणार आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.