भारतीय नौदल आणि डीआरडीओच्या एका पथकाने अलीकडेच भारतात निर्मित पहिला स्वदेशी ड्रोन तपसच्या कमांड अन् नियंत्रण क्षमतांचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे परीक्षण कारवार नौदल तळापासून 148 किलोमीटर अंतरावरील ग्राउंड स्टेशनवर करण्यात आले. तेथे हा ड्रोन 20 हजार फुटांच्या उंचीपर्यंत उड्डाण करण्यास यशस्वी ठरला आहे. आता या स्वदेशी ड्रोनचा वापर सीमांवर देखरेख ठेवण्यासह शत्रूंवर प्रहार करण्यासाठी केला जाऊ शकतो. या ड्रोनच्या निर्मितीस 2016 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. परंतु तपस हा ड्रोन आतापर्यंत भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेला नाही. या परीक्षणानंतर तपस ड्रोन लवकरच भारतीय सैन्यात सामील होणार असल्याचे मानले जातेय.
तपस बीएच 201 ड्रोन एक अटॅकिंग ड्रोन असून तो जवळपास 350 किलोग्रॅमचे वजन वाहून नेत उड्डाण करू शकतो. या ड्रोनची लांबी 9.5 मीटर असून याच्या पंख्यांची रुंदी 20.6 मीटर इतकी आहे. तपस ड्रोनचे वजन 1800 किलोग्रॅम असून याच्या पंखावर 2 एनपीओ सॅटर्न 36 टी टर्बोप्रॉप इंजिन बसविण्यात आले आहे. हे दोन्ही इंजिन्स 200 अश्वशक्तीची ऊर्जा पुरवू शकतात. तपस ड्रोनमध्ये नजीकच्या भविष्यात नवनव्या तंत्रज्ञानांचा समावेश करत त्याला अधिक घातक स्वरुप देण्याची योजना आहे.
भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण
पहिला स्वदेशी ड्रोन तपस हा 28 हजार फुटांच्या उंचीवर 18 तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत उड्डाण करू शकतो. हा एक मीडियम अल्टीट्यूट लाँग-इंड्युरेंस (एमईएलई) ड्रोन असून तो अमेरिकेच्या एमक्यू-1 प्रिडेटर ड्रोनसारखाच आहे. या ड्रोनला भारतीय सशस्त्र दलांसाठी गुप्तचर, टेहळणी मोहिमा साकारण्याच्या हेतूने डिझाईन करण्यात आले आहे. स्वत:च्या मोहिमेदरम्यान हा ड्रोन स्वत:च्या छोट्या लक्ष्यांची ओळख पटवून त्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे.
तपस हा स्वत:हून टेक ऑफ अन् लँड करण्याची क्षमता बाळगणारा ड्रोन आहे. या ड्रोनला पूर्वी रुस्तम-2 या नावाने संबोधिले जात होते. याचा कमाल वेग पूर्वी 224 किलोमीटर प्रतितास इतका होता. 20.6 मीटर इतका पंखाचा आकार असणारा तपस ड्रोन सलग 1 हजार किलोमीटरपर्यंत उ•ाण करू शकतो. तपस ड्रोन दिवसा तसेच रात्री दोन्हीवेळा टेहळणीसाठी वापरला जाऊ शकतो.
ड्रोनमधील इंजिन
भारताचा पहिला स्वदेशी ड्रोन म्हणजेच तपसमध्ये व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टेब्लिशमेंटकडून (व्हीआरडीई) निर्मित स्वदेशी इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन ड्रोनला 180 अश्वशक्ती इतकी ऊर्जा प्रदान करू शकते. भविष्यात या इंजिनच्या क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न व्हीआरडीईकडून सुरू आहेत.
प्रिडेटर ड्रोनची आवश्यकता
सध्या भारताला सर्वाधिक धोका चीनकडूनच आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनकडे विंग लाँग-2 ड्रोन असून तो रेकी करण्यासह हल्ला देखील करू शकतो. याचमुळे भारतीय नौदला प्रिडेटर ड्रोनची तत्काळ आवश्यकता आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात एमक्यू-1 प्रिडेटर ड्रोन खरेदीसाठी करार करण्यात आला आहे.
चिनी विंग लाँग-2 ड्रोन
विंग लाँग-2 ड्रोन हा विंग लाँग 1 ड्रोनचे अपडेटेड वर्जन आहे. या ड्रोनची निर्मिती चेंगदू एअरक्राफ्ट इंडस्ट्री कंपनीने केली आहे. विंग लाँग 2 ड्रोन दीर्घकाळापर्यंत उड्डाण करू शकतो. हा ड्रोन 1100 किलोग्रॅमपर्यंच्या वजनासोबत उड्डाण करण्यास सक्षम आहे. विंग लाँग ड्रोन 200 किलोपर्यंत अतिरिक्त वजन म्हणजेच स्फोटके वाहून नेऊ शकतो.
जगातील सर्वात दीर्घ पल्ल्याचे ड्रोन्स
शहीद-136 ड्रोन : हा ड्रोन रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला आहे. इराणकडून निर्मित शहीद-136 ड्रोनचा वापर युक्रेनियन क्षेत्रात हल्ले करण्यासाठी करत असल्याचा आरोप युक्रेनने अनेकदा केला आहे. शहीद-136 ड्रोनला ‘कामिकेज’ ड्रोन या नावानेही ओळखले जाते. या एका ड्रोनची किंमत 20 हजार डॉलर्स आहे. हा ड्रोन 11 फूट लांब अन् 200 किलोग्रॅम वजनाचा आहे. तसेच सुमारे 40 किलो वजन वाहून नेऊ शकतो. हा ड्रोन लक्ष्याचा सुगावा लागताच स्वत:च्या लक्ष्यानजीक पोहोचतो आणि स्वत:च्या पूर्ण क्षमतेने स्वत:च्या लक्ष्याला नष्ट करतो. याचबरोबर शहीद-136 ड्रोनचा निशाणा अचूक आहे, म्हणजेच हा ड्रोन कधीच लक्ष्यावरून विचलित होत नाही.
भारतीय ड्रोन धोरण
भारत सरकारने स्वत:च्या ड्रोन धोरणाला एक स्वतंत्र स्वरुप दिले आहे. ड्रोनच्या स्थानिक स्तरावर तयारीसाठी सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 120 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि ड्रोन निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी भारताने खासगी कंपन्यांसोबत सहकार्य देखील केले आहे. 2030 पर्यंत भारताला ड्रोनचे एक महत्त्वपूर्ण केंद्र करण्याच्या प्रयत्नांचा हा हिस्सा आहे. भारतीय वायुदलासाठी स्वार्म ड्रोन ‘न्यूज स्पेस’ नावाची कंपनी तयार करते. स्वार्म ड्रोनच युद्धाचे भविष्य असून भारत देखील यात भागीदारीचा प्रयत्न करत असल्याचे न्यूज स्पेसचे संस्थापक समीर जोशी यांचे सांगणे आहे.
ड्रोन स्टार्टअप्सना भारतात चालना
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकार नवे तंत्रज्ञान सादर करणाऱ्या स्टार्टअप्सना मदत करत आहे. या प्रयत्नांच्या अंतर्गत भारताने 2018 मध्ये एक ड्रोन स्टार्टअप पुरस्कार सुरू केला, जो पहिल्यांदा समीर जोशी यांची कंपनी न्यूज स्पेसने जिंकला होता. 2018 मध्ये भारतात 50-60 स्टार्टअप्स एका हजार ड्रोनच्या ऑर्डरसाठी स्पर्धा करत होते. आता अडीच हजार ड्रोन्सच्या ऑर्डर्ससाठी 200 कंपन्या आहेत. याचा अर्थ ड्रोनचा वापर अन् त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. भारताचे संरक्षण क्षेत्र आता ड्रोनच्या वापराला गांभीर्याने घेत असल्याचे आयडिया फोर्ज नावाच्या कंपनीचे सीईओ अंकित मेहता यांनी सांगितले आहे. ड्रोनच्या नियमांना दुर्लक्षित करण्यापासून नकार देईपर्यंत आणि मग समर्थन करण्यापासून त्याला स्वीकार करण्यापर्यंतचा बदल पाहिला असल्याचे वक्तव्य मेहता यांनी केले आहे. मेहता यांच्या कंपनीने तयार केलेले ड्रोन्स आता चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याकडून वापरले जात आहेत. सैन्याने त्यांच्या कंपनीसोबत उंचीवर उडणारे आणि उभे उड्डाण करणारे ड्रोन उपलब्ध करण्यासाठी अनेक करार केले आहेत. हे ड्रोन्स सीमावर्ती क्षेत्रांच्या देखरेखीसाठी सैन्याकरता एक उपयुक्त अस्त्र ठरू शकतात. हे ड्रोन्स अत्यंत उंचीवर शून्यापेक्षा कमी तापमानातही उड्डाण करु शकतात आणि दीर्घकाळापर्यंत आकाशात ‘ट्रेस’ न होता स्वत:ची मोहीम फत्ते करू शकतात. मेहता यांच्या कंपनीच्या ड्रोन्सचा वापर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठीही करण्यात आला आहे.
भारतात ड्रोन्सची तयारी
भारताचा स्थानिक ड्रोन कार्यक्रम अमेरिकन ड्रोनच्या वापराद्वारे सुरू झाला होता. या ड्रोनच्या मदतीने डीआरडीओने ‘लक्ष्य’ नावाचा ड्रोन तयार केला आहे, जो मानवी दृष्टीच्या पलिकडेपर्यंत जाऊ शकत होता. यानंतर डीआरडीओने ‘निशांत’ आणि ‘गगन’ यासारखे अनेक शॉर्ट रेंज ड्रोन्स तयार केले असून त्यात हाय रिझोल्युशन थ्रीडी छायाचित्रे मिळविण्याची क्षमता आहे. अशाचप्रकारे ‘रुस्तम 2’ स्वत:हून लँडिंग करण्याची क्षमता राखून आहे. टेहळणी आणि हेरगिरीसाठी हा सर्वोत्तम ड्रोन आहे. तसेही भारताने सर्वाधिक ड्रोन इस्रायलकडून आयात केले आहेत. भारताने पहिल्यांदा 1998 मध्ये इस्रायलकडूनच ड्रोन आयात केला होता. अधिक उंचीवर उड्डाण करणाऱ्या आधुनिक ड्रोन्ससाठी भारताला अन्य देशांवर निर्भर रहावे लागते. अलीकडेच अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 प्रिडेटर ड्रोन्ससाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. हे ड्रोन्स अधिक उंचीवर उड्डाण करू शकत नसल्याने त्यांना ‘हाय अल्टीट्यूट लाँग एंड्यूरेन्स’ ड्रोन म्हटले जाते. भारताने याचबरोबर ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करण्यास यश मिळविले आहे. ही यंत्रणा काश्मीरमध्ये तैनात करण्यात आल्याचे मानले जाते. लढाऊ ड्रोन्ससोबत भविष्यात ड्रोनविरोधी यंत्रणाही संरक्षण दलांकरता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भारतातील पहिला स्वदेशी ड्रोन…
तपस ड्रोनचे पूर्ण नाव टॅक्टिकल एअरबोर्न प्लॅटफॉर्म फॉर एरियल सर्व्हिलान्स बियॉन्ड होराइजिन आहे.
या ड्रोनची निर्मिती संरक्षण संशोधन अन् विकास संघटनेकडून (डीआरडीओ) करण्यात आली.
स्वदेशी ड्रोन तपसचे यशस्वी परीक्षण भारतीय नौदलाने 16 जून 2023 रोजी केले आहे.
तपस ड्रोनच्या कमांड आणि नियंत्रण क्षमतेची पडताळणी करणे हा या परीक्षणाचा उद्देश होता.
उमाकांत कुलकर्णी