मंदिराच्या नूतन वास्तूच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात आयोजन, पर्तगाळ मठाधीशांच्या हस्ते सन्मान
खोल : शिरोटी, खोल येथील श्री ग्रामदेव लक्ष्मीनारायण देवस्थानच्या नवीन वास्तूचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन नुकताच विविध कार्यक्रमांनिशी साजरा झाला. मुख्य सोहळ्यास श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी उपस्थित होते. यावेळी देवस्थान समिती, महाजन व खोलकर ट्रस्ट यांच्यावतीने स्वामेची पाद्यपूजा करण्यात आली. स्वामींच्या हस्ते ज्येष्ठ महाजन गुरुदास पंढरी प्रभुदेसाई, जिवोत्तम पुरस्कार प्राप्त झालेले प्रकाश श्रीरंग प्रभुदेसाई, पुंडलिक राया प्रभुदेसाई व श्यामकांत प्रभुदेसाई यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लक्ष्मीनारायण देवस्थानतर्फे संलग्न आदिनाथ देवालय, माटवे-खोल व वागोण येथील कपिलेश्वर देवस्थानाच्या बांधकामासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश स्वामींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी यांचे आशीर्वचन झाले. त्यात त्यांनी निसर्गाची देणगी लाभलेल्या परिसरात वसलेल्या या देवालयाच्या वास्तूचा मुक्तकंठाने गौरव केला. देवाचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी गुरुंचा आशीर्वाद व देवाची कृपा हवी असते. जिथे विश्वास असतो तिथे देव साहाय्य करत असतो. या गोष्टी खोलकर महाजनांकडे असल्याने मंदिराची ही भव्य वास्तू साकारली असल्याचे ते म्हणाले. देवस्थानचे अध्यक्ष पंढरी प्रभुदेसाई यांनी स्वागत केले व देवस्थानचा इतिहास थोडक्यात कथन केला. सचिव संतोष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.