रोपबाजार तीन दिवस चालणार : विविध जातींची रोपे एकाच छताखाली : सेंद्रिय शेती, मध, आळंबीबाबत मार्गदर्शन
बेळगाव : बागायती शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आलेल्या बागायत महोत्सवाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. खासदार मंगला अंगडी, आमदार आसीफ सेठ, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यांच्या उपस्थितीत या महोत्सवाला चालना दिली. हा रोपबाजार पुढील तीन दिवस चालणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात रोप बाजारचे आयोजन करून चांगल्या जातीची रोपे प्रर्यावरण प्रेमी आणि बागायतदारांना उपलब्ध करून दिली जातात. यंदा देखील या महोत्सवात काजू, अंबा, पेरू, चिक्कू, फणस, सीताफळ, लिंबू, नारळ यासह विविध जातींची शोभीवंत आणि फळा, फुलांची रोपटे सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
महोत्सव बागायतदारांना पर्वणी ठरणार
गतवर्षी भरविण्यात आलेल्या रोप बाजाराला पर्यावरण प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यंदा देखील या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बागायत खात्याने ठेवली आहे. याबरोबर सेंद्रिय खते, गांडूळ खत यांचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याबरोबर कीटकनाशके, पामची झाडे, मध आणि आळंबी उत्पादन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे हा महोत्सव पर्यावरण प्रेमी व बागायतदारांना पर्वणी ठरणार आहे. महोत्सवात विशेषत: टोमॅटो, मिरची आणि इतर भाजी पाल्यांचे तरू उपलब्ध केले आहे. शिवाय सेंद्रिय शेतीबाबत बागायतदारांना माहिती दिली जात आहे. विविध प्रजातींची रोपे एकाच छताखाली उपलब्ध होत असल्याने खरेदीदारांची सोय होणार आहे.
एकाच ठिकाणी रोपांचे प्रदर्शन अन् खरेदीही-महांतेश मुरगोड, सहसंचालक बागायत खाते
विविध जातींची रोपे, सेंद्रिय शेती, पामची झाडे, आळंबी, मध आदींच्या उत्पादनाबाबत माहिती दिली जात आहे. त्याबरोबर एकाच छताखाली फळ, फुलांची रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध रोपांचे प्रदर्शन आणि खरेदीही करता येणार आहे.