वृत्तसंस्था/ अहमदाबाद
नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या रविवारी होणार असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या वाढत्या मागणीमुळे गुजरातच्या अहमदाबादमधील हॉटेल खोल्यांचे दर आणि शहरातील विमानसेवांचे भाडे गगनाला भिडले आहेत. विश्वचषक अंतिम लढतीचा ज्वर शिगेला पोहोचत असताना शहरातील प्रमुख पंचतारांकित हॉटेल्समध्ये सामन्याच्या रात्री खोल्यांचे शुल्क वाढून प्रत्येकी 2 लाख ऊपयांपर्यंत पोहोचले आहे. इतर हॉटेल्सनीही त्यांचे दर पाच ते सातपटींनी वाढविले आहेत.
विश्वचषक फायनलसाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर दुबई, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतूनही लोक सामना पाहण्यासाठी येऊ इच्छित आहेत, असे ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गुजरात’चे अध्यक्ष नरेंद्र सोमाणी यांनी सांगितले. अहमदाबादच्या तीन तारांकित आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये 5,000 खोल्या आहेत, तर संपूर्ण गुजरातमध्ये ही संख्या 10,000 आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता 1.20 लाखांहून अधिक लोकांची आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की, सामना पाहण्यासाठी 30 ते 40 हजार लोक बाहेरून येतील, असे ते म्हणाले.
हॉटेलांच्या खोल्यांची मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढत चालले आहेत. पूर्वी नाममात्र दरात उपलब्ध होणाऱ्या खोल्यांचे दर आता 50 हजारांपासून ते 1.25 लाख ऊपयांपर्यंत पोहोचले आहेत. हॉटेल आरक्षित करण्यापूर्वी लोक विमान तिकीट बूक करतात. सामन्याचा दिवस जसजसा जवळ येईल तसतशा केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर आसपासच्या शहरांमधील हॉटेलांच्या खोल्यांच्या किमतीही वाढणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
पंचतारांकित हॉटेल्सच्या विविध बुकिंग साइट्सवरील दर प्रति रात्र सुमारे 2 लाखांवर पोहोचलेला आहे. आयटीसी नर्मदा आणि हयात रीजेंसीसारख्या हॉटेल्सनी तर सामन्याच्या रात्रीसाठी ऑनलाइन नमूद केलेले दर 2 लाख ऊपयांपेक्षा जास्त आहेत. बिगरतारांकित हॉटेलांनीही गर्दी पाहून पाच ते सात पटीने दर वाढवले आहेत. सी. जी. रोडवरील हॉटेल क्राउन, जे साधारणपणे एका रात्रीच्या मुक्कामासाठी तीन ते चार हजार ऊपये आकारत होते, त्यांचा दर 20 हजार ऊपयांपेक्षा जास्त झाला असून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी याची पुष्टी केली.
दरम्यान, अहमदाबादमध्ये विविध ठिकाणांहून येणाऱ्या विमानांच्या प्रवासाचे भाडेही सामान्य दरांच्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. चेन्नईहून येणाऱ्या फ्लाइटसाठी एरव्ही दर सुमारे 5,000 ऊपये आहे, परंतु तो आता 16,000 ते 25,000 ऊपये झालेला आहे. अहमदाबादला जास्त मागणी असल्याने, जवळपास सर्व ठिकाणांहून शहरात येणाऱ्या विमानांचे तिकीट दर तीन ते पाच पटींनी वाढले आहेत, असे मनुभाई पांचोली या ट्रॅव्हल एजंटने सांगितले. क्रिकेट चाहते आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या या संधीचा फायदा घेण्यासाठी आणि भारताला मायदेशी फायनलमध्ये खेळताना पाहण्यासाठी मोठी किंमत मोजायला तयार आहेत. हॉटेल्स आणि विमान प्रवासाला असलेली मागणी वाढत चालली आहे, असे त्यांनी सागितले.