उचगाव/वार्ताहर-
गांधीनगर ता.करवीर येथील पाच बंगला परिसरातील सिल्वर पॅलेस अपार्टमेंटमध्ये काल चोरी झाली. या अपार्टमेंटमधील
पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अनिल चेटुमल नागपाल यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी काल फोडला. दाराची कडी कोंयडा उचकटून अज्ञात चोरट्यानी भर दिवसा साडेचार लाखांच्या रोख रकमेसह साडेअकरा तोळ्याचे सोन्या चांदीचे दागिने असे मिळून नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता-6) साडे अकराच्या सुमारास घडली .या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, पाच बंगला परिसरातील सिल्वर पॅलेस अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर ५०१ क्रमांकाच्या बंगल्यात अनिल नागपाल कुटुंबासह राहतात.त्यांचे कोल्हापूरात महालक्ष्मी चेंबर्समध्ये मोबाईल विक्रीचे दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे काल सकाळी दहा वाजता कोल्हापुरात दुकानाकडे गेले होते.त्यांच्या पत्नी कोमल नागपाल या मुलांना घेऊन कोल्हापूरमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी गेल्या होत्या.घरी कोणी नसल्याचे पाहून सकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी शेजारील घरांना बाहेरून कडी लावून नागपाल यांच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला.कटावणीच्या साह्याने तिजोरी उचकटून तिजोरीतील दोन तोळ्याचे मंगळसूत्र, चार तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या,सोन्याचे सेट चेन,लॉकेट, कानातील फुले असा साडेअकरा तोळ्याचे दागिने आणि रोख रक्कम ४ लाख ५० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
दुपारनंतर कोमल या घरी आल्यानंतर घराचा दरवाजासह, तिजोरी उचकटलेली निदर्शनासास आली. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती अनिल नागपाल यांना दिली. नागपालांनी या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना दिली.सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन श्वानास पाचारण केले.पण श्वान घटनास्थळी घुटमळले.अज्ञात चोरट्याच्या शोधासाठी शोध पथक रवाना केले असून याबाबतची फिर्याद अनिल चेटुमल नागपाल यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.दरम्यान घटनास्थळी करवीर डीवायएसपी संकेत गोसावी यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करत आहेत. सहा मजली अपार्टमेंट असुन येथे व परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.