दहा-बारा लाखाचे नुकसान : चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे एका घराला आग लागून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, धान्य, भांडी व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. तर चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळी सणामध्ये घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. याबाबतचे वृत्त असे की, बसवण कुडची येथील मेन रोडवरील शेतामध्ये अनिता अनंत कौलगी व सविता बिरणोई या दोन बहिणी आपल्या कुटुंबासोबत राहतात. शेती व्यवसाय करून त्या आपल्या घरचा उदरनिर्वाह चालवतात. सोमवारी सकाळी घरामध्ये पूजा करून त्या गावातील कलमेश्वर-बसवेश्वर मंदिरला गेल्या असता घराला आग लागली. आगीची घटना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत घरातील एका सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच 4 लाख 75 हजार रुपये रोख, साडेपाच तोळ्dयांचे सोन्याचे दागिने, धान्य, भांडी व इतर साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. त्यामुळे कौलगी व बिरणोई कुटुंबीयांचे अंदाजे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्या घराचे नुकसान झालेले पाहून कौलगी व बिरणोई कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.घटनास्थळी तलाठी नैनागौडा व शशिधर गुरव यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच आमदार राजू सेठ यांनी घटनास्थळी भेट दिली व कौलगी व बिरणोई कुटुंबीयांना आर्थिक मदत करून आमदार फंडातूनही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
उंदराने दिवा पाडविल्याने आग
उंदराने घरातील दिवा पाडविल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कौलगी व बिरणोई कुटुंबीयांचे घर शेतामध्ये असल्याने त्याठिकाणी उंदरांचा जास्त वावर आहे. देवघरातील साखर खाण्याच्या प्रयत्नात उंदराने दिवा पाडविल्यानेच आगीची घटना घडल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.