मुंबई : मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी आणि डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डबेवाला ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, डबेवाला असोसिएशन अध्यक्ष रामदास करवंदे व भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
आ. भारतीय यांनी सांगितले की, 1890 पासून मुंबईमध्ये सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मालकीची घरे मिळावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याबाबत आपण विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डबेवाल्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडा, सिडको तसेच महसूल विभागाकडून जागा घेऊन डबेवाल्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
डबेवाल्यांना त्यांची सेवा देणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी त्यांना घरे देण्यात येतील. डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आणि मार्गी लावला डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी उपयुक्त असलेले मुंबई डबेवाला भवन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आ. भारतीय म्हणाले.