नवीन सॉफ्टवेअरसाठी राष्ट्रीयकृत बँक देणार 55 लाखांचा सीएसआर फंड: मनपातील फेऱ्या होणार बंद, घरबसल्या सेवा मिळणार
कोल्हापूर/विनोद सावंत
महापालिकेचा घरफाळा विभाग हायटेक होणार आहे. सध्याचे कालबाहय़ झालेले स्वॉफ्टवेअर बदलण्यात येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेला यासाठी एक रूपयाचाही खर्च होणार नाही. एका राष्ट्रीयकृत बँकेने 55 लाखांच्या सीएसआर फंड मनपाला नवीन स्वॉफ्टवेअर घेण्यासाठी देणार आहे. यामुळे मिळकतधारकांना घरफाळा विभागाच्या कामासाठी महापालिकेच्या फेऱया माराव्या लागणार नसून घरबसल्या सर्व कामे होणार आहेत. घरफाळा विभागाचे 2008 पूर्वीचे स्वॉफ्टवेअर असून कालबाहय़ झाले आहे. नवीन ई गर्व्हनन्स सिस्टिममध्ये घरफाळा विभागाचा समावेश नाही. त्यामुळे महापालिकेला यासाठी स्वतंत्र स्वॉफ्टवेअर घ्यावे लागणार होते. सुमारे 55 लाखांचा खर्च आहे. एक राष्ट्रीयकृत बँक यासाठी सीएसआर फंड देण्यास तयार आहे. राज्यातील आठ महापालिकेना या राष्ट्रीयकृत बँकेने घरफाळय़ाचे स्वॉफ्टवेअरसाठी सीएसआर फंड दिला आहे. यामध्ये ठाणे महापालिकेचा समावेश असून सध्या येथील स्वॉफ्टवेअर कार्यन्वित झाले आहे. कोल्हापूर महापालिकेचे कर निर्धारक, संगणक विभाग प्रमुख, मुख्य लेखापाल याची टिमने तेथे जावून पाहणी केली आहे. यानंतर हे सॉफ्टवेअर स्विकराण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळै मिळकतधारकांना घरफाळा विभागातील 10 सेवा घरबसल्या मिळणार आहेत.
मिळकतधारकांना नवीन सॉफ्टवेअरचे फायदे
घरबसल्या मिळकतीचा असेसेमेंट करता येणार
घरफाळा किती लागणार ते घरबसल्या समजणार
नाव हस्तांतर करण्यासाठी मनपात यावे लागणार नाही.
ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार
एका क्लिकवर प्रॉपीटीकार्डचा उतारा मिळणार
घरफाळा बील ऑनलाईन पाहता येणार
घरफाळा घरबसल्या जमा करता येणार
सवलत योजनेची माहिती मिळणार
महापालिकेला फायदा
एक रूपयाही खर्च न करता 55 लाखांचा सॉफ्टवेअर मिळणार
मिळकताधारकांना 15-2 ची नोटीस ऑनलाईन बजावता येणार
मिळकतधारकांचा पत्ता, क्षेत्रसह आदी माहिती अचुक मिळणार
पेपरलेसमुळे वेळेची बचत, कामकाज बिनचुक होणार
मिळकतधारकांना थकबाकीची रक्कम, अंतिम तारीखेचा मोबईलवर संदेश
मिळकतधारकच करणार सेल्फ असेसेमेंट
नवीन सॉफ्टवेअरमध्ये मिळकतधारकांना घरबसल्या सेल्फ असेसेमेंट करता येणार आहे. क्षेत्रासह सर्व माहिती सविस्तर अपलोड केल्यानंतर घरफाळा किती लागू होणार ते मिळकतधारकाने समजणार आहे. तसेच मिळकतधारकांनी केलेल्या सेल्फ असेसेमेंटचा मनपा घरफाळा विभागाचे कर्मचारी जागेवर जावून खात्री करून संबंधिताच्या मिळकतीस ऑनलाईनच घरफाळा लागू करणार आहेत.
तीन महिन्यांत घरफाळा विभाग हायटेक
सीसीएआर फंडातून घरफाळा विभागाला सॉफ्टवेअर घेण्याबाबत कायदेशीर बाबींची माहिती घेतली जात असून आठ दिवसांत संबंधित बँकेसोबत करार होईल. यानंतर नवीन सॉफ्टवेअरचे कामकाज सुरू होईल. सॉफ्टवेअरची पाच वर्ष देखभाल दुरूस्तीही संबंधित बँकच करणार आहे. पुढील तीन महिन्यांत नवीन सॉफ्टवेअर कार्यन्वित होवून घरफाळा विभागातील सर्व कामे घर बसला करता येतील.
यशपाल रजपूत, सिस्टिम मॅनेजर, महापालिका