आपल्या पृथ्वीचा अर्धा भाग नेहमी प्रकाशात असतो आणि अर्ध्या भागात नेहमी अंधार असतो हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक क्षणाला पृथ्वीचा विशिष्ट भाग अंधारात, तर त्याच्या विरुद्ध बाजूला भाग प्रकाशात असतो. पण एक रेषा असे असते की जेथे प्रकाश आणि अंधार एकमेकांना जुळलेले असतात. अशा स्थानी पृथ्वीचे दृष्य नेमके कसे असते, याचे छायचित्र नुकतेच युरोपियन स्पेस एजन्सीने (युरोपियन अवकाश संशोधन संस्था) प्रसिद्ध केले आहे. अत्यंत विलोभनीय असेच हे दृष्य असते असे पाहणाऱ्यांचेही म्हणणे आहे. या छायचित्रात दिवस आणि रात्र यांचे मनोहारी मीलन दिसून येते. पृथ्वीचा एक अर्धगोल प्रकाशात तर एक अर्धगोल अंधारात असल्याचे हे दृष्य असून ते विस्मयकार आहे.
हे छायाचित्र मेटेओसेट या उपग्रहाने टिपले असून ते 23 सप्टेंबरला सकाळी ग्रीनीज मीन टाईमनुसार 9 वाजता काढण्यात आले आहे. यात युरोप खंडाचा बराचसा भाग अंधारात, तर आशिया खंडाचा बराचसा भाग प्रकाशात असल्याचे पहावयास मिळते. हे छायाचित्र इतके स्पष्ट आहे की आपण त्यात आपला देशही शोधू शकतो. ज्यावेळी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताला पार करत होता, तेव्हा ते काढण्यात आले. यावेळी उत्तर गोलार्धात शरद ऋतू तर दक्षिण गोलार्धात वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे. भारतीय संस्कृतीच्या भाषेत सांगायचे, तर उत्तर गोलार्धात उत्तरायण संपून दक्षिणायनाचा प्रारंभ होण्याच्या काळात घेतलेले हे छायाचित्र आहे. हे दृष्य अविस्मरणीय आहे, असे पाहणाऱ्यांचे मत आहे.