त्रीसा-गायत्री यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /कौलालंपूर
भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वि वार्डोयोवर विजय मिळविला.
आठव्या मानांकित प्रणॉयने जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असणाऱया वार्डोयोवर 21-9, 15-21, 21-16 अशी मात केली. या मोसमातील बीडब्ल्यूएफ टूरवरील ही पहिली स्पर्धा आहे. प्रणॉयने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले. पहिला गेम जिंकल्यानंतर प्रणॉयला वार्डोयोच्या इनसाईड आऊट फटक्यांना यशस्वीरीत्या सामोरे जाता आले नाही आणि हा गेम वार्डोयोने जिंकून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूं क्रॉसकोर्ट स्मॅशेसवर एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रणॉयने पाच गुणांची आघाडी घेतली आणि ती कायम राखत गेमसह सामना 64 मिनिटांत जिंकून आगेकूच केली.
तत्पूर्वी, महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना बल्गेरियाच्या जागतिक चौदाव्या मानांकित गॅब्रिएला स्टोएव्हा व स्टेफानी स्टोएव्हा यांच्याकडून 21-13, 15-21, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला.