नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेड सध्या एक निर्मिती कारखाना घेण्याचा बेत आखते आहे. मिळालेल्या माहितीनुसार हय़ुंडाईने जनरल मोटर्सचा भारतातील कारखाना खरेदी करण्याचा विचार चालवला आहे.
सूत्रांनुसार तळेगाव, महाराष्ट्र येथे जनरल मोटर्सचा कारखाना कार्यरत आहे. जागा आणि त्याठिकाणी असणारी इमारत हय़ुंडाई कंपनी घेण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. तळेगाव येथे जनरल मोटर्सची जागा, इमारत त्यासोबत काही मशिनरीही आहे. या संपूर्ण मालमत्तेचे हस्तांतरण कंपनी हय़ुंडाईकडे करणार आहे, असे कळते. यासंदर्भात खरेदी कराराला नियामकाकडून मान्यता मिळणे बाकी आहे.
कशासाठी घेणार कारखाना?
कंपनीचा भारतात इरुंगत्तुकोट्टाय येथे मोठा निर्मिती कारखाना आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करायचं असून त्याकरीता हा दुसरा कारखाना घेणे कंपनीसाठी महत्त्वाचे असणार आहे, असे बोलले जाते.