यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सामना न गमावणारा भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी पहिली पसंती ठरला होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत 140 कोटी भारतीयांच्या विजेतेपदाचं स्वप्न भंग केला. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मानं या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आम्ही विजयासाठी आवश्यक चांगला खेळ करू शकलो नाही याची आम्हाला कल्पना आहे. पण मला संघातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा अभिमान आहे, असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.
आम्ही सर्वकाही प्रयत्न केले, पण आम्ही यश मिळवू शकलो नाहीत. आणखी 20-30 धावा असत्या, तर चांगले झाले असते. केएल राहुल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली आहे. आम्ही 270 आणि 280 धावांकडे पाहत होतो, पण विकेट्स लवकर पडत गेल्या, असे रोहितने कबूल केले.
“जेव्हा तुम्ही 240 धावा बनवता, तेव्हा तुम्हाला विकेटची गरज असते. मात्र, हेड आणि लाबुशेन यांना खेळ पुढे नेण्यासाठी श्रेय दिले पाहिजे. सायंकाळचा वेळ फलंदाजीसाठी चांगला होता. मात्र, मी यावर कोणतीही स्पष्टीकरण देत नाहीये. आम्ही धावा करू शकलो नाहीत आणि हेड आणि लाबुशेनच्या भागीदारीला श्रेय दिले पाहिजे, असे रोहितने शेवटी नमूद केले.