अध्याय एकोणतिसावा
भोळ्याभाबड्या भक्तांसाठी ब्रह्मप्राप्तीचा सहजसोपा उपाय सांगा असा लकडा उद्धवाने भगवंतांच्यामागे लावल्यावर उद्धवाला साध्याभोळ्या लोकांच्या उद्धाराची किती कळकळ हे समजून भगवंत त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले, उद्धवा भोळ्याभाबड्या सर्वसामान्य लोकांनी त्यांचा उद्धार होण्यासाठी माझी भक्ती करावी. त्यामुळे मी त्यांना वश होऊन सदैव त्यांचाच होऊन राहतो. माझे भजन करणे म्हणजे भागवत धर्माचे आचरण करणे होय. असे भजन केले की , पूर्वी केलेल्या दुष्कर्मामुळे झालेले नुकसान भरून येते आणि जन्ममरणाचे दुष्टचक्र संपुष्टात येते. भवाची म्हणजे संसाराची सर्व व्यथा समूळ उन्मळून जाते. साधकाला आपोआपच सुखसंपन्नता येते. भागवत धर्म अतिसुमंगल असून तो सर्व दोषांचे दहन करतो. माझ्या भजनामुळे मंगलाचेही परम मंगल होते. अत्यंत श्रद्धेने मी सांगत असलेल्या भागवत धर्माचे आचरण केले की माझ्या स्वरूपाबद्दल प्रेम उत्पन्न होते. त्यामुळे समोर दिसणारी दुनिया खरी आहे असा झालेला भ्रम नाहीसा होऊन जन्ममरणांचा फेरा चुकतो. उद्धवा, हा जन्ममरणाचा फेरा चुकवणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. कुणालाही आपण एक ना एक दिवस मरणार ही कल्पना मुळातच पसंत नसते. पूर्वी सर्व राक्षसांनी देवाला प्रसन्न करून घेतल्यावर मला अमर कर हीच इच्छा बोलून दाखवल्याचे तुला आठवत असेलच. पण जन्माला आलेला प्रत्येक जीव आज ना उद्या मरणार हे निश्चित आहे. त्यामुळे मृत्यूवर विजय मिळवणे हे अतिशय कठीण असते. असा हा विजय मिळवण्यास अशक्य असलेला मृत्यू सुरासुरांच्या हृदयात धडकी भरवून त्यांना थरथर कापायला लावतो. असे जरी असले तरी भक्तिभावाने माझे भजन करणारे भक्त मात्र मृत्यूची खतावणी फाडून टाकण्यास सक्षम असतात. मृत्यूचे भय संपल्यामुळे ते आनंदाने संसार करत असतात. हे सर्व ऐकून उद्धव भगवंताना म्हणाला, तुमच्या भजनाचे महात्म्य ऐकून मी संतुष्ट झालो आहे. आता मृत्यूवरही मात करणारे तुझे भजन कसे करायचे तेही कृपया सविस्तर सांगा अशी माझी विनंती आहे. उद्धवाच्या इच्छेनुसार भागवत धर्माचे संपूर्ण लक्षण भगवंत सांगू लागले. ते म्हणाले, उद्धवा तू माझ्या जीवाचा सखा आहेस आणि सख्याशी बोलायला मला फार आवडते. त्यामुळे माझ्या भजनाचा महिमा किती आणि केवढा आहे हे मी तुला सांगतो. माझ्या भजनाच्या महात्म्याबद्दल आधी सांगतो. अनेक शस्त्रांचे वार झेलून सुद्धा शूर योद्धा जिवंत राहतो. पण जर समोरच्या योध्याने त्याच्या वर्मावर घाव घातला तर तो तात्काळ मरण पावतो. त्याप्रमाणे साधकाने नाना साधनांचे घाव घालूनसुद्धा त्याच्या जन्ममरणाचा नाश होत नाही. परंतु ज्याने माझ्या अल्पशा भजनरुपी भजनाचा घाव जन्ममरणावर घातला तर मात्र वर्मी घाव बसल्याप्रमाणे त्याचे जन्ममरण समूळ नष्ट होते. देशकालानुरूप जे कुलाचार प्राप्त झालेले आहेत ते आणि वेदांनी सांगितलेल्या नित्यनैमत्तिक कामांना कर्मे असे म्हणतात. माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने जे कर्म केले जाते त्याला साधारण-मदर्थ असे म्हणतात. सगळ्या कर्मांचा मीच कर्ता असून कर्मसिद्धीही मीच साधून देतो. एव्हढेच नव्हे तर कर्मफलाचा मीच भोक्ता आहे. यालाच कर्म कृष्णार्पण करणे असे म्हणतात. सुरवातीला माणसाचे मन हे सहजासहजी मानायला तयार होत नाही. त्याने हळूहळू माझे अनुसंधान राखायला सुरवात करून ते अखंड होऊ लागले की मग मात्र त्याचे मन माझ्या स्वरुपात रममाण होते. सुरवातीला माझे अनुसंधान करणे मनाला फारसे पसंत पडत नसल्याने त्याला त्यांची बिलकुलच आवड नसते. तरीही ज्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी असे वाटते त्याने जमेल तसे माझे स्मरण करत रहावे. म्हणजे मनाला त्याची सवय होते आणि मग माझ्या भजनाची त्याला गोडी लागते. असे जरी असले तरी माणसाची बुद्धी त्याला दगा देत असते. माणसाच्या बुद्धीला देहाचा फार अहंकार असल्याने देहसुख हेच परमोच्च सुख आहे, अशी खात्री वाटत असते.
क्रमश?