अध्यायएकोणतिसावा
भगवंत म्हणाले, हा देश सर्वार्थाने पावन झालेला आहे. ज्या गावात माझे भक्त राहतात तो गाव अत्यंत पवित्र होतो आणि ज्या देशात साधुसंत राहतात तो देश ते पवित्र करतात. ज्या ठिकाणाला भक्तांचा वारा लागतो ते ठिकाण अतिपवित्र होते. त्यांची सत्संगती ज्यांना लाभते तेही पवित्र होतात. ज्याचा भाग्योदय झालेला असेल त्यालाच सत्संगती लाभते आणि ती लाभलेले साधक निश्चितच पावन होतात. माझे अखंड भजन केल्यामुळे माझ्या स्वरूपावर ज्यांचे चित्त सतत जडलेले असते त्यांनाच मद्भक्त म्हणतात. तेच खरे संतसज्जन होत. माझ्या भक्तांचे आचरण एव्हढे सुसंस्कृत असते की त्यांना त्याबद्दल देव, मनुष्यच काय राक्षसही वंदन करतात. म्हणून साधकाने निश्चिंतपणे त्यांचे अनुकरण करावे. ज्याप्रमाणे नारद, प्रल्हाद, अंबरीष असे श्रेष्ठ भक्त रात्रंदिवस माझ्या भक्तीत रममाण होतात त्याप्रमाणे साधकानेही माझ्या भक्तीत तल्लीन व्हावे. त्यासाठी भक्ताने वार्षिक यात्रा, पर्वपूजा, अधोक्षजाला अर्पण कराव्यात. छत्रचामरादि गोष्टी, गरुडध्वजांकित चिन्हे इत्यादि राजेमहाराजांना शोभणाऱ्या गोष्टी श्रद्धेने देवाला अर्पण कराव्यात. अत्यंत उत्साहाने अहोरात्र माझे भजन करावे, हत्ती, घोड्यांवर माझी मूर्ती विराजमान करून मिरवणूक काढावी किंवा शेषशायी अथवा गरुडावर आरूढ झालेल्या माझ्या मूर्तीची महोत्सवात रथयात्रा काढावी. टाळ, झांजा, शंख, मृदंग आदि मंगल वाद्यांच्या साथीने आकाश दणाणून सोडणाऱ्या आवाजात माझ्या जयजयकाराच्या गर्जना कराव्यात. देवापुढे नृत्य, गीत, पोवाडे, कीर्तने ह्यांची एकच धूम उडवून द्यावी. गोपाळकाला आदि भक्तीच्या विविध प्रकारांनी मला आळवावे.
त्यासाठी सुंदर आणि अनुरूप वेशभूषा करून वातावरण निर्मिती करावी. त्यात भक्तांनी अगदी रंगून जावे. अशाप्रकारे महामहोत्सव साजरा करावा. ह्यामागे उद्देश एकच सदैव माझे ध्यान मनात असावे. अर्थातच ह्यासर्वासाठी अपार धनाची गरज असते ह्याची मला जाणीव आहे. ज्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य आहे त्यांनी स्वबळावर सर्व उत्सव करावा. पैशाअभावी तसे करणे शक्य नसेल त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन, एकविचाराने पैशाची व्यवस्था करून, महामहोत्सवाचे आयोजन करावे आणि थाटात उत्सव साजरा करावा. ही सर्व धडपड करण्याचे कारण म्हणजे हा सर्व खटाटोप करणाऱ्यांना माझ्या भक्तीची चढतीवाढती गोडी लागावी. माझे महात्म्य मनात ठसावे. स्वत:कडे कर्तेपण घेण्याची माणसाला उपजतच आवड असते पण सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत हे लक्षात आले की, आपल्यापेक्षा वरचढ कुणीतरी आहे आणि तो ह्या सर्व गोष्टी त्याला हव्या तशा घडवून आणत आहे ह्याची मनोमन खात्री पटते. विशेष म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे घडणाऱ्या गोष्टी आपल्या हिताच्या होत आहेत हेही लक्षात येते आणि मग मात्र मनुष्य आपोआपच माझ्या भजनी लागतो. सर्व कर्तृत्व आणि भोत्तृत्व मला अर्पण करून निश्चिंत होतो. मी त्याच्या भल्याच्या गोष्टी घडवून आणत आहे हे लक्षात आले की, त्याचे माझ्यावर प्रेम बसते. तो माझी भक्ती करू लागतो आणि त्यातून त्याला माझ्याबद्दल अधिकाधिक प्रेम वाटू लागते. सुरवातीला त्याला माझ्या भक्तीची विशेष गोडी नसते पण म्हणतात ना सहवासाने प्रेम वाढते त्याप्रमाणे तो जसजशी माझी भक्ती करू लागतो तसतसे माझ्याबद्दलचे त्याचे प्रेम वाढीस लागते. ते अखंड टिकून रहावे ह्यासाठी ह्या सर्व उत्सवाचे प्रयोजन आहे. त्यामुळे माझ्याबद्दलचे भक्ताचे प्रेम आणखीनच वाढते.
भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात मी सांगितलं आहेच की, मी ह्या जगाचा आधार असून माय, बाप, वडील आहे. तसेच ह्या सगळ्याचा मी साक्षी, स्वामी, सखा, भर्ता आहे. ह्याची मनोमन खात्री पटल्यामुळे संपूर्ण उत्सवकाळात केवळ मी आणि मीच त्याच्या मनात वास करून असतो. तेथे अन्य विचारांना थारा नसल्याने तो सदोदित माझाच विचार करत असतो.